नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील बहुप्रतिक्षीत पोटनिवडणुकीची तारीख अखेर जाहीर झाली आहे. भारतीय निवडणूक आयोगाने बंगालमधील तीन आणि ओडिशामधील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार भवानीपूर विधानसभा जागेवर ३० सप्टेंबरला मतदान होईल. तर ३ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी याच जागेवरून निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केल्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या जिवात जीव आला आहे. पण, ही निवडणूक ममता जिंकेल का ? असा प्रश्नही उपस्थितीत केला जात आहे. भाजप येथे पूर्ण ताकदीने उतरेल. पण, यावेळेस ममता बँनर्जीची बाजू थोडी सरस असणार आहे. ममताचा विजय झाला तर त्या मुख्यमंत्रीपदावर त्या कायम राहतील. पण, पराभव झाला तर त्यांना पद सोडावे लागेल. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावर राहणार की जाणार असा प्रश्न निकालापर्यंत चर्चेत राहणार आहे.
एएनआय वृत्तसंस्थेनुसार, ३० सप्टेंबरला भवानीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. याच दिवशी बंगालमधील समसेरगंज, जंगीरपूर आणि ओडिशामधील पिपली येथेही पोटनिवडणूक होईल. ३ ऑक्टोरला मतमोजणी होईल. इतर ३१ मतदारसंघातील निवडणुका कोरोना परिस्थितीमुळे लांबणीवर टाकल्या आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले. १३ सप्टेंबरला नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. उमेदवार १६ सप्टेंबरपूर्वी आपले नाव मागे घेऊ शकतात. संवेधानिक गरज आणि पश्चिम बंगालच्या विशेष विनंतीवर विचार केल्यानंतर भवानीपूर (ममता बॅनर्जी यांची परंपरागत जागा) जागेसाठी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी अत्याधिक सतर्कता बाळगून कठोर नियम घालून देण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. ज्या सात विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीचा प्रस्ताव आहे, अशांमध्ये मुर्शिदाबाद, जंगीपूर, समसेरगंज, २४ परगणामधील गोसाबा, दक्षिण मेदनीपूरमध्ये खरगपूर, नादियामधील शांतीपूर, कूचबिहारमधील दिनहाटा आणि भवानीपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.