कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर काही तासातच ममता बॅनर्जी यांनी पोलिस यंत्रणेत फेरबदल करत २९ वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यातील बहुतांश पोलिस अधिकार्यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीपूर्वी बदली केली होती. त्याशिवाय कूच बिहार जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक देबाशिष धर यांना राज्य सरकारडून निलंबित करण्यात आले आहे. सीतलकूची जागेवर १० एप्रिलला झालेल्या मतदानादरम्यान सीआयएसएफच्या कथित गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेप्रकरणी यापूर्वीच सीआयडीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
बुधवारी सायंकाळी बदलीची ऑर्डर काढण्यात आली. त्यानुसार, वरिष्ठ अधिकार्यांना जुनी पदे देण्यात आली आहेत. त्यामध्ये पोलिस महासंचालक वीरेंद्र, अतिरिक्त महासंचालक (कायदा सुव्यवस्था) जावेश शमिम आणि महासंचालक (संरक्षण) विवेक सहाय यांचा समावेश आहे.
देबाशिष धर यांच्या जागेवर कन्नन यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. कन्नन यांना निवडणुकीदरम्यान पदस्थापनेमुळे वेटिंगवर ठेवण्यात आले होते. निवडणूक आयोगाने डीजीपी वीरेंद्र यांची बदली करून त्यांच्या जागेवर नयन पांडे यांची नियुक्ती केली होती. पांडे यांची महासंचालकपदी (अग्निशमन सेवा) नियुक्ती करण्यात आली आहे.
अतिरिक्त महासंचालक (कायदा सुव्यवस्था) जगमोहन यांची बदली करून त्यांची सिव्हिल डिफेंस विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी जावेद शमिम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मेदिनीपूरमधील पुरबा येथे एका प्रचारसभेदरम्यान ममता बॅनर्जी जखमी झाल्यानंतर त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कसूर केल्याबद्दल सहाय यांना महासंचालकपदावरून हटविण्यात आले होते.