मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेत आज मोठा गदारोळ झाला. कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू झाला नसल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानसभेत दिली. या उत्तराला विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यातच शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.
आदिवासी समाजासाठी आपण काहीच करू शकलो नाही याची लाज वाटली पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. या शब्दावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार आक्षेप घेतला. हा असंसदीय शब्द असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मुनगंटीवार म्हणाले की, तुम्ही गेले अडीच वर्षे सत्तेत होते. त्यामुळे तुमच्या वडिलांना (म्हणजे उद्धव ठाकरे) लाज वाटली पाहिजे असे म्हणायचे का? यानंतर सभागृहात एकच गदारोळ माजला. दोन्ही बाजूच्या आमदारांनी एकमेकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
कुपोषणासंदर्भातील सर्व माहिती उच्च न्यायालयात दिल्याचे गावित यांनी सांगितले. आदित्य यांच्याशिवाय काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही गावित यांच्या प्रश्नावर आक्षेप घेत हे असंवेदनशील असल्याचं म्हटले आहे. त्याचवेळी मंत्र्यांचे उत्तर टेबलवरून काढून टाकावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांच्या वतीने करण्यात आली.
आदित्य म्हणाले की मंत्री कुपोषणाबाबत चुकीची माहिती देत आहेत. आदिवासी समाजाची अवस्था पाहिली तर राजकारणी म्हणून लाज वाटेल, असे ते म्हणाले. शिवसेना आमदाराच्या उत्तरानंतर मुनगंटीवार संतप्त होऊन त्यांनी संसदीय भाषा वापरायला हवी होती, असे म्हटले.
आदित्य ठाकरे नेमके काय म्हटले, बघा त्याचा हा व्हिडिओ
https://twitter.com/ShivsenaComms/status/1562696215984488448?s=20&t=Nxru0JdhE8yAdwuSSDVUbw
Malnutrition Aditya Thackeray Controversy
Minister Vijay Kumar Gavit Answer
Trible People Maharashtra Monsoon Assembly Session