नवी दिल्ली – कायद्यात संशोधन करून दुकानांमध्ये काम करणार्यांना बसण्याचा अधिकार (राइट टू सीट) देण्याच्या प्रस्तावामुळे तामिळनाडूमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. मोठे मॉल, शोरूम्समध्ये सेल्समनना बसण्यासाठी जागा दिलेली नसते. अशा सेल्समनना बसण्याचा अधिकार मिळावा यासाठीच कायद्यात सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु दुकानात काम करणारे सेल्समनच नव्हे, तर अशा अनेक नोकर्यांमध्ये उभे राहून काम करावे लागते. सलग उभे राहून काम केल्यामुळे शारिरीक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो असा दावा करण्यात आला आहे.
तामिळनाडू सरकार हा कायदा मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. संबंधितांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा कायदा संमत करणे गरजेचे आहे असे सांगितले जात आहे. प्रत्येक कर्मचारी प्रत्येक वेळी बसूनच काम करेल असे नाही. परंतु दुकानांमध्ये कर्मचार्यांना बसण्याची व्यवस्था करावी जेणेकरून संधी मिळाल्यास ते बसू शकतील, अशी तरतूद प्रस्तावित कायद्यात करण्यात आली आहे. राज्यघटनेच्या ४२ व्या परिच्छेदातही कामाच्या ठिकाणी योग्य मानवीय स्थिती सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तसेच २१ व्या परिच्छेदानुसार जीवन जगण्याच्या अधिकारात प्रतिष्ठीतरित्या जीवन जगण्याचा सर्वांना अधिकार मिळालेला आहे.
केंद्राने धोरण ठरवावे
कामाच्या ठिकाणी बसण्याच्या अधिकाराबाबत निवृत्त न्यायमूर्ती शिवकीर्ती सिंह सांगतात, की केंद्र सरकारने यासंदर्भात धोरण ठरवून मार्गदर्शक सूचना निश्चित कराव्यात. सर्व गोष्टींचा विचार करून कंपन्या, कार्यालयांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून धोरण ठरविण्याची आवश्यकता आहे. सगळ्याच ठिकाणी एकसमान स्थिती नसल्याने धोरण ठरविताना वर्गीकरण करण्याची गरज भासू शकते. केंद्राने संपूर्ण देशाबाबत विचार केला तर अधिक संयुक्त कायदा तयार होऊ शकतो.
सैनिकांची ड्युटी
देशाच्या राष्ट्रध्वजाचे संरक्षण करणारे सैनिकही उभे राहूनच ड्युटी करतात. परंतु त्यासाठी काही नियम आहेत. निवृत्त मेजर जनरल जी. के. एस. परिहार सांगतात, लष्करातील कार्यालयीन कामांसाठी असा कोणताही नियम नाही. एक व्यक्ती कितीही वेळ उभे राहून ड्युटी करू शकतो. परंतु उभे राहून काम करणारांची ड्युटी ठाराविक वेळेत बदलत असते. राष्ट्रध्वजाचे संरक्षण करणार्या सैनिकांची ड्युटी दर दोन तासांनी बदलते. अशाच प्रकारे गार्डची ड्युटी करणारे चार जण असतात. एक व्यक्ती ड्युटी करताना इतर तीन जण आराम करतात.
सशस्त्र दलातील सैनिक आणि सामान्य नागरिकांमध्ये मोठा फरक आहे. लष्करात कठोर प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे शारिरीक आणि मानसिकरित्या सैनिक सक्षम होतात. त्यांच्या पोषाखामध्ये आरोग्य आणि सुविधेची काळजी घेतली जाते. सैनिकांचे बूट विशेष असतात. अँकलेट लावल्याने त्यांचे पाय सुरक्षित असतात.
सामान्य माणसांची ड्युटी
नोएडातील एका कपड्यांच्या कारखान्यात धागा कापण्याचे काम करणार्या निर्मला सांगतात, त्या सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ड्युटी करतात. संपूर्ण ड्युटीच्या काळात सकाळी ११ वाजता आणि सायंकाळी चार वाजता १५-१५ मिनिटांची विश्रांती मिळते. एक वाजता अर्धा तासाच्या जेवणाची सुटी असते. विश्रामासाठी वेळ मिळूनही अनेक लोकांच्या पायावर सूज येते. तर काहींना इतर समस्याही निर्माण होतात. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी ए. के. अनुरागी सांगतात, सलग उभे राहून आणि एकाच स्थितीत काम करणार्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. अनेक तास उभे राहून काम करणार्या कर्मचार्यांना अनेक प्रकारचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पायाच्या शिरा ताणल्या जातात, पायावर सूजही येते, पायांच्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होण्यासारख्या समस्या निर्माण होतात.