मालेगाव – तालुक्यातील सोयगाव येथील शेतकरी दीपक बच्छाव यांनी भाजीपाला मालाला योग्य दर नसल्याने, शेतीत टाकलेले पैसे, मजुरी देखील सुटत नसल्याने, आणि जिल्हा बँकेच्या हफ्ते भरण्याच्या तकाद्यामुळे, हतबल होऊन कारले पीक शेती बांधाच्या उकिरड्यावर फेकून दिले. कृषीमंत्री दादा भुसे यांच्या तालुक्यातच हा प्रकार घडला आहे.
बच्छाव यांचे तालुक्यातील काष्टी फाट्यावर शेत असून कारले पिकाला कायम चांगला भाव असल्या कारणाने तीन एकरात कारल्याची लागवड केलेली. त्यासाठी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या कडून तीन ते साडे तीन लाख रुपये भांडवल जमवले व कारले लागवड केली. आजरोजी कारले भाव चार रुपये किलो असल्याने, भाव कमी असल्याकारणाने विक्रीही करू शकत नाही कारण कारले तोडून बाजारात नेण्यासाठी जेवढा खर्च येतो तेवढा खर्च देखील निघत नसल्याने पीक फेकण्याची वेळ ह्या शेतकऱ्यावर आली आहे. त्यात जिल्हा बँकेचे सात ते आठ लाख रुपये शेती कर्ज थकीत असल्यामुळे त्यांचा कर्जवसुलीसाठी तगादा चालू असून जमिनीवर ताबा घेण्याचा प्रयत्नात असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
कारले पिकासाठी तीन लाख रुपये खर्च केला आणि १०० टक्के खर्च आजच्या आजच्या घडीला पूर्ण वाया गेलेला आहे त्यातून कोणते प्रकारचे उत्पन्न आलेच नाही तर कर्ज कसे पडणार? ह्या यक्ष प्रश्नामुळे बच्छाव हे हतबल झाले असून काय करावे हे कळेनासे झाले आहे. शेतीसाठी झालेले कर्ज कसे फेडणार, मुलांच्याऑनलाईन शिक्षणासाठी साठी पैसा कुटून येणार, त्यात जिल्हा बँकेचा जप्ती इशारा यामुळे बच्छाव हे हवालदिल झाले असून रडकुंडीस आले आहेत. रक्ताचे पाणी करून, दिवसरात्र कष्ट करून पिकवलेल्या मालाला चांगला भाव मिळेल याची खात्री नसतांना सुद्धा देशाला पोसणाऱ्या या पोशिंद्याच्या मालाला सरकार कधी हमी भाव देणार. शेतीमालाला हमी भाव नसल्याने, कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या वाढत असून सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल संतप्त शेतकरी विचारत आहेत. पीक विम्याचा पैसा वेळेवर मिळत नसल्याने ह्या वर्षी ऐंशी हजार शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवली आहे.
कोणत्याच पिकांना भाव नाही
शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकांना भाव नाही, त्यातच पावसानेही शेतकऱ्यांकडे डोळे वटारून बघितल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून अनेक प्रकारची पिके आपल्या शेतात पिकवली आहेत. परंतु सध्या कोणत्याच पिकांना दर नसल्याने शेतकरी चिंतित असून, बँकेच्या कर्ज वसुलीच्या तगाद्याला शेतकरी वैतागला आहे.
चिंता लागून आहे
शेतकऱ्यांचे जीवन म्हणजे मौत का कुवा झाले आहे. काहीही करा धोका मिळणारच कधी पाऊस देणार तर कधी मालाचा दर. संपूर्ण देशाला पोसणाऱ्या शेतकऱ्यांना हमी भाव देणारं सरकार कधी जन्म घेईल देव जाणो. दीपक बच्छाव यांची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. भाजीपाला मालाला भाव नसल्या कारणाने उदरनिर्वाह चा प्रश्न निर्माण झाला असून बँक जप्ती झोप लागू देत नाही. मुलांचे शिक्षण, वृद्ध आईचा दवाखाना कसा करावा, ही चिंता लागून आहे.
शरद पाटील, सोयगाव