नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मित्र-मैत्रीणींसमवेत फिरण्यासाठी आलेल्या १८ वर्षीय मालेगावच्या तरूणाचा गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाला आहे. पाय घसरून तो पाण्यात पडला. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अखेर तो बुडाला. ही घटना सावरगाव शिवारातील चैतन्य फार्म परिसरात घडली आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पंदन बिंदूमाधव गायकवाड (१८ रा.चर्च मागे, मालेगाव कॅम्प) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. गायकवाड हा आपल्या मित्र-मैत्रीणींसमवेत फिरण्यासाठी शनिवारी (२१ मे) गंगापूर डॅम भागात आला होता. सावरगाव शिवारातील चैतन्य फार्म जवळील धरणाच्या पाण्यात सायंकाळच्या सुमारास तो हात-पाय धुण्यासाठी गेला. त्याचवेळी तो अचानक पाय घसरून पडला. तेथे पाण्याची खोली अधिक असल्याने आणि त्याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्र-मैत्रिणींनी जोरदार आरडाओरड केल्याने नजिकच्या नागरीकांनी धाव घेतली. तातडीने त्यांनी शोध कार्य हाती घेतले. जीवरक्षकांनी अवघ्या काही वेळातच स्पंदन यास हुडकून काढले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात रवाना करण्यात आला. याप्रकरणी गौरव अहिरे (रा.लखमापूर ता.मालेगाव) या युवकाने दिलेल्या माहितीवरुन तालुका पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार जोपळे व पाटील करीत आहेत.