अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातून एक चिंताजनक बातमी आहे. गेल्या दोन महिन्यात शहरामध्ये १०० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बालकांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, यामुळे महापालिका प्रशासन चिंतेत आहे. आरोग्य यंत्रणेने याची दखल घेतली असून याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात गेल्या दोन महिन्यात तब्बल १००हून अधिक बालकांचा मृत्यू झाला आहे. मृत बालकांमध्ये १ ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचा समावेश आहे. तशी नोंद महापालिकेमध्ये करण्यात आली आहे. कुपोषणामुळे हे मृत्यू झाले की अन्य काही कारणे आहेत याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मात्र दोन महिन्यात १०० पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. या मृत्यूचे नेमके कारण काय आहे, योग्य पोषण न मिळणे हे आहे की काही आजाराने हे मृत्यू होत आहेत याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यामुळे यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने लवकरच खुलासा होण्याची चिन्हे आहेत.