मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुण्यातील कात्रज घाटात शिवशाही बस बंद पडल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेले मदतकार्य आणि नादुरुस्त बसची सध्या चर्चा होत आहे. त्यातच आता आज शहरात एक घटना घडली आहे. एसटी बस अचानक शहरातील छावणी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली. सर्वांच्याच भुवया उंचावल्या. थोड्याच वेळात सर्व प्रवाशांची झाडाझडती सुरू झाली. आणि ही बाब त्वरीत गावभर पसरली.
छावणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगावहून सटाणा येथे जाणारी ही एसटी बस होती. बसस्थानकातून ही बस निघाली. त्यानंतर मोसम पूल येथील थांब्यावर थांबली. तेथे काही प्रवासी चढले आणि पुन्हा बस सटाण्याच्या दिशेने निघाली. तेवढ्यात एसटी बसमध्ये एका महिला प्रवाशाने तक्रार केली ही तिची सोन्याची पोत व पैसे बसमध्ये चोरी झाले आहे.
वाहक त्यावेळी तिकिटे काढत होता. मीना पवार या प्रवाशी महिलेने तिकीट काढण्यासाठी पर्स उघडली असता पर्स मधील १ हजार ५०० रुपये व दोन तोळे सोन्याची पोत देखील चोरी झाल्याचे लक्षात आले. महिला प्रवाशांनी चोरी झाल्याचे वाहकाला सांगितले त्यानंतर वाहकाने थेट गाडी छावणी पोलीस स्थानकात नेली.
पोलिसांनी बसमधील प्रत्येक प्रवाशाचे नाव लिहून प्रत्येकाच्या सोबत असलेली बॅग व पिशवी तपासली. तसेच त्यांची चौकशी केली. मात्र सोन्याची पोत आणि पैसे काही सापडले नाहीत. अखेर प्रवाशांना पुन्हा बसमधे बसवून बस सटाण्याकडे मार्गस्थ झाली. पोत आणि पैसे नेमके गाडीत चढतांना चोरी झाले की गाडीत बसलेल्यांपैकी कोणी चोरले याचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र, ही घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे.
Malegaon ST Bus Police Station Checking