मालेगाव – १२ नोव्हेंबरला पुकारण्यात आलेल्या बंदच्या वेळी नवीन बसस्थानक परिसरात जमावाने काही दुकानांची तोडफोड केली होती, इतकेच नव्हे तर एका हॉस्पिटल व एका एटीएमवर दगडफेक करण्यात आली होती. या रुग्णालयात तोडफोड व जाळपोळ, तसेच दगडफेक करताना या धुमाकुळामध्ये जमावाने पोलिसांवर केलेल्या दगडफेकीत तीन पोलिस अधिकारी, सात जवान व दोन शांतता समिती सदस्य, असे १२ जण जखमी झाले होते.
या दंगलप्रकरणी जनता दलाचे सरचिटणीस तथा नगरसेवक मुश्तकीम डिग्निटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात येणार होती, परंतु अनेक दिवस तपास करूनही ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर महिन्याभरानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली. मात्र आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन शक्तिप्रदर्शन करीत डिग्निटी हे पोलिसांना हिंसाचार व दंगल प्रकरणातील गुन्ह्याबाबत शरण आले. मात्र या गुन्ह्यातील सहा ते सात मुख्य संशयित अद्यापही फरारी आहेत.
यापूर्वी पोलिसांनी विविध गुन्ह्यांत पन्नासहून अधिक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. अद्यापही संशयितांच्या अटकेच्या कारणावरून शहरात गदारोळ या सुरूच आहे. वास्तविक मागील महिन्यात या दंगलीत सुमारे १२ लाख रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली होती. त्याशिवाय २० वर्षांच्या शांतता व एकात्मतेला तडा गेला. पोलिसांनी संतप्त जमाव पांगविण्यासाठी १२ अश्रुधुराची नळकांडी फोडली. रबर बुलेट यांचा मारा केला होता.
या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगरसेवक मुश्तकीम डिग्निटी यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे की, राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी शासन केंद्र सरकारप्रमाणेच विरोधकांचा आवाज दडपण्याचा, मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मालेगाव येथील मोर्चा व दंगल प्रकरणी जनता दल व एमआयएम कार्यकर्त्यांवर दाखल खोटे गुन्हे केले असून, राज्य शासनाने हे षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्रिपुरातील मुस्लिम समाजावर होत असलेले हल्ले, मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराच्या निषेधार्थ रझा ॲकॅडमी व ऑल इंडिया सुन्नी जमेतुल उलेमातर्फे पुकारलेल्या बंदला धार्मिक संघटनांसह शहरातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता.
तसेच त्या दिवशी दुपारपर्यंत बंद सुरळीत व शांततेत पार पडला. मात्र, मोर्चानंतर बंदला शहरात हिंसक वळण लागले. रॅलीत घुसखोरी केलेल्यांनी हा गोंधळ घातला असावा. मात्र, या प्रकरणी फक्त आमच्यावरच गुन्हे दाखल झाले. राज्य शासनातर्फे दबाव आल्यानंतर विरोधकांवर दंगलीसह अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला
आहे.