मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सरदारनगर भागात असलेल्या अन्वर शकील अहमद यांच्या सिल्व्हर किंग यंत्रमाग कारखान्याच्या कार्यालयाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने केबिन मधील टेबलच्या ड्रॉवर ठेवलेले तब्बल २७ लाख रुपये लंपास केले. या चोरीची ही सर्व घटना सीसीव्ही मध्ये कैद झाली असून आझादनगर पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहे.
चोरटयाने या पावरलुम कारखान्याच्या बाहेरील अगोदर दरवाजाचे कुलूप तोडले. त्यानंतर आतमध्ये प्रवेश करुन त्यानंतर कॅबिनची काच फोडली. कॅबिनमध्ये प्रवेश केल्यानंतर टेबलच्या आतल्या कप्प्यात ठेवलेले २७ लाख १६० रुपये त्याने थैल्यात भरले. अन अवघ्या पाच मिनिटात तेथून पोबाराही केला. या घटनेत रोकड भरलेली पिशवी उचलत नसल्याने खांद्यावर ठेवून चोरटा पसार झाला.
या घटनेनंतर आझादनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच भागातील मदरशांमधील हॉस्टेलमधून तीन लाखांपेक्षा अधिक रकमेची चोरीची घटना अगोदर झाली होती. त्यानंतर ही चोरी झाली आहे. या घटनेनंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक एकबीर सिंग संधू, आझाद नगरचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी संशयितांची ओळख पटल्याचे व त्याला लवकरच अटक करु असे सांगितले.