मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आषाढी एकादशी निमित्ताने नाशिकच्या मालेगाव मधील साई आर्टच्या रांगोळी कलाकारांनी सर्वांना अनोखी भेट दिली. सर्व कलाकारांनी एकत्र येत बारा बाय अठरा आकाराची पंढरीच्या वारीची रांगोळी साकारली. त्यामुळे ती सध्या आकर्षण आणि चर्चेची बाब ठरली आहे.
कलाकारांनी सलग ८० तास राबत सुंदर अशी पंढरीच्या वारीची रांगोळी साकारली. या रांगोळीत लेक पिगमेंटचे रासायनिक रांगोळीचे रंग एकत्रित करण्यात आले आहेत. सुमारे ३५ किलो रांगोळीच्या माध्यमातून ही सुबक रांगोळी आकारास आली आहे.
साई आर्टचे प्रमोद आर्वी हे नेहमी अशा विविध प्रकारच्या रांगोळी आपल्या कलाकारांमार्फत साकारत असतात. रांगोळी पूर्ण झाल्यावर ती मालेगावकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे. आषाढीच्या दिवशी ही सुखद भेट मिळाल्याने प्रेक्षकही सुखावले आहेत.