मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरातील आझाद नगर भागात एका टोळक्याने हातात तलवारी व शस्त्रे घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला असून ही घटना मागील आठवड्यातील असून त्या घटनेचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. शहरात सर्वत्र पोलीस रात्री गस्त घालत असताना मध्यरात्री खुलेआम शस्त्रे घेऊन फिरणारी टोळी पोलिसांना नजरेस का पडली नाही असा सवालही उपस्थितीत केला जात आहे. तलवारी घेऊन टोळके ज्या व्यक्तीचा शोध घेत होते त्याचा शोध त्यांना लागला असता तर मोठा अनर्थ घडला असता असेही बोलले जात आहे. शहरात सतत होणाऱ्या घरफोड्या, वाहन चोऱ्या होत असल्यामुळे अगोदरच नागरिकांची नाराजी आहे. त्यात ही दहशत निर्माण टोळी आता समोर आली आहे.