मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भूमीपूजन होऊनही वर्षभरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरणाचे काम सुरु झाले नाही, ते तात्काळ सुरू करावे यासाठी आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे आज धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. त्याचप्रमाणे या कामाच्या दिरंगाईला जबाबदार असलेल्या मालेगाव महानगर पालिका अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी सुध्दा यावेळी करण्यात आली.
मालेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व शिवतीर्थ परिसराचे सुशोभीकरण करावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून अनेक संघटना करत आहेत. त्यानुसार गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले होते. आज एक वर्ष होत आले परंतु शिवतीर्थाचे सुशोभीकरण काम सुरू झाले नाही असे आंदोलकांनी सांगितले.