मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दाभाडी येथील गिसाका कॉलनीत पैशांसाठी दोघा मुलांनी आपल्या आईचा खून करुन आईने आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुलकनबाई किसन सोनवणे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी दोघां मुलांना गजाआड केले आहे. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी सकाळी ही घटना घडली आहे. सुलकनबाई यांच्या पतीचे निधन झाल्यामुळे त्या मोठा मुलगा भगवान किसन सोनवणे व लहान मुलगा संदीप किसन सोनवणे यांच्यासोबत गिसाका कॉलनीत राहत होत्या. सुलकनबाई यांच्याकडे यांच्याकडे असलेल्या पैशांवरुन हे दोघे सतत त्यांच्याशी वाद घालत होते. सोमवारी हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर मुलगा भगवान आणि संदीप याने सुलकनबाई यांचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर या दोघांनी आपल्या आईने आत्महत्या केली असा बनाव केला. पण, पोलिसांनी या घटनेची चौकशी केल्यानंतर या खूनाचा उलगडा झाला. चौकशीत मुलांनीच गळा आवळून मारल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघा भावांना हिसका दाखवताच त्यांनी कबुली दिली.