मालेगाव ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरातून चोरांनी चक्क शाळेच्या विद्यार्थ्यांची फी पळवल्या प्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. येथील हारून अन्सारी उर्दू प्रायमरी स्कुलच्या जे. ए.टी. कॅम्पसमधून चोरट्यांनी मुख्याध्यापक कार्यालयातील कपाटातील १६ लाख लंपास केले आहे. हे पैसे मुलांच्या शैक्षणिक व परिक्षा फीचे होते.
या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद सुलेमान मोहम्मद सलीम उर्फ माने, मोहम्मद बिलाल शब्बीर अहमद, उर्फ बिल्ला, मोहम्मद आमीन निसार अहमद, उर्फ ताडे, अफताब अहमद अब्दुल अजीज उर्फ प्याराबार अशा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या सर्वांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने अंगझडती घेतली असता मोहम्मद आमीन निसार अहमद याच्या पाठीस लावलेल्या काळया बॅगमध्ये रक्कम २ लाख २५ हजार रुपये मिळून आले. तसेच अफताब अहमद अब्दुल अजीज याच्या पाठीस लावलेल्या निळया बॅगेत रक्कम ३ लाख २० हजार रुपये व मोहम्मद बिलाल शब्बीर अहमद यांच्याकडून रक्कम ३ लाख ६९ हजार रोख हस्तगत करण्यात आली आहे.
सदर गुन्हयात आतापर्यंत एकूण ९ लाख १४ हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर संशयितांना ६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना १० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तपास पथकाच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी त्यांना रोख रूपये १० हजार चे बक्षिस देवून त्यांचा गौरव केला आहे.