मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरात कुत्ता गोळीचे पेव फुटले असून पोलिसांनी शहरातील न्यू मदनीनगर भागात अवैधरित्या औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या रईस शहार उर्फ शहा याच्यावर छापा टाकून त्याच्या कब्जातून गुंगीकारक औषधी गोळ्यांच्या १० हजार ८० रुपयांच्या २८० स्ट्रीपचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील संशयित हा त्याचा फरार साथीदार मुज्जमील याच्यासह मालेगाव शहरात विनापरवाना वैद्यकिय क्षेत्राचे कोणतेही ज्ञान नसतांना शरीरावर परिणाम करणा-या गुंगीकारक औषधी गोळयांची विक्री करताना आढळून आले. संशयितांविरोधात आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात रईस शहार उर्फ शहा मालेगाव यास अटक करण्यात आली असून पुढील तपास आझादनगर पोलीस ठाण्याचे पोउनि तागड हे करीत आहेत.
७० हजार ६०० रुपये किंमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त
तसेच मालेगाव शहरातील नामपुर रोड- गोविंदनगर, चंदनपुरी रोड-पवारवाडी तसेच मनमाड शहरातील सुभाष रोड परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने छापे टाकून कारवाई केली आहे. सदर कारवाईत मालेगाव शहरातील संशयित प्रविण भालचंद्र नेरकर, खलील अहमद मोहम्मद इसाक तसेच मनमाड येथील जमीरखान उस्मानखान पठाण यांच्यावर छापे टाकून त्यांचे कब्जातून किंमती ७० हजार ६०० रुपये किंमतीचा अवैध गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला असून सदर संशयितांविरुद्ध मालेगाव कॅम्प, पवारवाडी व मनमाड पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.
नाशिक जिल्हयात अवैधरित्या सुरू असलेल्या व्यावसायांविषयी नागरीकांना काही माहिती द्यावयाची असल्यास नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलाचे हेल्पलाईन क्रमांक ६२६२२ ५६३६३ यावर संपर्क साधावा व आपल्या परिसरातील गोपनीय व्यवसायांची माहिती दयावी, माहिती देणा-यास त्याचे नाव विचारले जाणार नाही व त्याची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल असे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.