अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मालेगाव शहरातील बहुचर्चित कॉलेज ग्राऊंडवर अनेक कार्यक्रम होतात, तर वर्षातून दोन वेळेस येथे नमाज सुध्दा पडली जाते. पावसाळ्यात या ठिकाणी अनेक वेळेस पाणी साचते. गेल्या काही दिवसांपूर्वीच या ग्राऊंड भोवती अद्यावत असे लाखो रुपये खर्चून जॉगिंग ट्रॅक बनविण्यात आले. मात्र काल रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसामूळे संपूर्ण कॉलेज ग्राऊंड मध्ये पाणी साचले आणि हा ट्रॅक पाण्याखाली गेला. नियोजनशून्य कारभार आणि पाणी वाहून जाण्याची कुठलीही पुरेशी व्यवस्था नसल्याने पहिल्याच मुसळधार पावसाने जॉगिंग ट्रॅक पाण्याखाली गेल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या ट्रॅक मध्ये साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिकेने सकाळ पासून पंपाव्दारे पाणी उपसा सुरु केला.