मालेगाव: सामान्य रुग्णालय, मसगा, सहारा कोविड सेंटरसह महिला रुग्णालयात आज स्वच्छता मोहिम कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राबविण्यात आली. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राहूल पाटील, महानगरपालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, वैभव लोंढे, राजु खैरनार, रामा मिस्तरी, प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, राजेश गंगावणे, छाया शेवाळे यांच्यासह सर्व स्वच्छता निरीक्षक व सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळ्यास लवकरच सुरवात होणार आहे. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी प्रत्येक विभागाने दक्षता बाळगावी. समन्वयातून नदी, नाल्यांची नियमीतपणे सफाई करण्यात यावी. तालुका, ग्रामपातळीवरील आराखडे अद्ययावत करावे. पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सतर्क राहावे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून घ्यावा. शुध्द पाण्याचा पुरवठा होईल असे नियोजन करावे. अशा सुचना मंत्री भुसे यांनी यावेळी दिल्या.
महिला रुग्णालयातील औषध भांडारातील औषध साठ्याची पडताळणी मंत्री भुसे यांनी केली. तर सामान्य रुग्णालयातील ड्रेनेज टाक्यांसह त्याची पाईपलाईन व इतर किरकोळ कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सुचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कोणीही व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकत असेल वा थुंकत असेल तर त्याला प्रत्येकाने प्रतिबंध करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.