अजय सोनवणे
मालेगाव – पूर्वी पायी, नंतर बैलगाडी, ट्रँक्टर, ट्रक, टेम्पोवर व-हाडी मंडळी लग्नाला जात असे. आता तर बस, चारचाकी वाहनाची व्यवस्थाच वधू वर पित्याला व-हाडी मंडळीसाठी करावी लागते. लग्नसमारंभ संपल्यानंतर वरासाठी व वधूला सासरी आणण्यासाठी हायटेक चारचाकी वाहनाची व्यवस्था वरपक्ष करत असतो. परंतु या हायटेक खोट्या प्रतिष्ठेला फाटा देत दासनुर यांची कन्या वधू गितांजली व मालेगाव येथील काळे कुटुंबीयांचे सुपूञ डॉ. अविनाश यांनी लग्नमारंभ संपल्यावर चक्क बैलगाडी वर घरापर्यंत प्रवास केला. उच्च शिक्षित जोडप्याच्या या पारंपरिक पद्धतीच्या प्रवासाची सर्वञ चर्चा आहे. वधू गितांजली बी. फार्म तर वर डॉ. अविनाश एमबीबीएस चे शिक्षण झाले आहे.
बैलगाडीचे बैल देखील रंगीबेरंगी रंगांनी सजवले होते. बैलगाडीच्या पुढच्या भागात विविध रंगाच्या फुलांचा गुच्छ करून लावण्यात आले होते. तर बैलगाडीला विविध रंगांच्या फुलांची कमान सजविण्यात आली होती. बैलगाडीवर वधू वर रस्त्यावररून जात असताना वाहनधारक आपले वाहन थांबवून कुतूहलाने पाहत होते. पादचारी, दुकानदार, तसेच घरातून बाहेर निघत बघ्यांची गर्दी झाली होती. सुमारे पाच किलोमीटर बैलगाडीचा प्रवास करत वधू सासरी पोहचली. वराच्या घराच्या आजूबाजूला राहणा-यांनी तोबा गर्दी केली होती तर ज्येष्ठांना आपल्या लग्नाच्या वेळीचा बैलगाडीचा प्रवास आठवत चर्चा करत होते.