मालेगाव – तामिळनाडूमधून आलेल्या काही भामट्यांनी शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडवल्याचा प्रकार घडला आहे. या भामट्यांनी सुरुवातीला शेतकऱ्यांशी थेट शेतात जाऊन संपर्क केला. यानंतर रक्त चंदनाच्या झाडांची लागवड करण्याचे आवाहन करत त्यांनी रक्तचंदनाचे महत्त्व सांगत कोट्यधीश कसे बनु शकता याबाबत भूलथापा दिल्या.
देवळा तालुक्यातील गिरणारे, कुंभार्डे तसेच मालेगाव तालुक्यातील झाडी व चांदवड तालुक्यातील कोकणखेडे या गावांमध्ये हा फसवणूकीचा प्रकार घडला आहे. या फसवणूकीबाबत शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची तक्रार केली. दरम्यान, या भामट्यांचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
या फसवणूक करणा-या भामट्यांनी श्री लक्ष्मी गणपती नर्सरी गार्डन या संस्थेच्या नावाने प्रति झाड दोनशे रुपये जमा केले. तसेच ज्या शेतकऱ्यांनी २०० ते ३०० चंदनाचे झाडे लावल्यास त्या शेतकऱ्यांना बोरवेल, शेताला कुंपण, सोलरचा विद्युत पंप अशा सुविधा फुकटात मिळणार असल्याचे आमिष या भामट्यांनी दाखवले. त्यामुळे शेतकरी या भूलथापांना बळी पडले. रोपटे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. थोड्याच दिवसांत या भामट्यांचा मात्र फोन बंद आला. कुणाशीही संपर्क होत नसल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी पोलिस अधिकक्षकांकडे धाव घेऊन तक्रार केली.