मालेगाव : त्रिपुरा येथे मुस्लीम समाजातील नागरिकांवर हल्ला करून धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल काही कट्टरपंथी यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.१२) रोजी मालेगाव बंदची हाक देण्यात आली होती. सकाळपासून बंदला मुस्लिम बहुल भागात चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान दुपारनंतर बंदला हिंसक वळण लागले. त्यामुळे पोलीसांना बळाचा वापर करावा लागला.
त्रिपुरा येथे मुस्लीम समाजातील नागरिकांवर हल्ला करून धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल काही कट्टरपंथी यांनी अपशब्द वापरले. त्याच्या निषेधार्थ रजा अकादमी तसेच इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यातंर्गत मालेगावी ही दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी सुन्नी जमेतुल उलमा व रजा अँकेडमीसह मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. या बंदला पूर्व भागात कडकडीत प्रतिसाद मिळाला मिळाला. व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने सकाळपासूनच किदवाई रोड, कुसुंबा रोड, जुना आग्रा रोड, मो अली रोड, पेरी चौक आदीसह अन्य भागात शुकशुकाट पसरला होता.
बंद दुपारपर्यंत शांततेत पार पडत असतांना शहरातील अचानक काही भागातून तरूणांचे मोर्चे विशद टॉवरजवळ येवून धडकले. यावेळी घोषणा देत तरुणांनी परिसर दणाणून सोडला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संतप्त तरुणांचा जमाव जावू नये यास्तव लोखंडी जाळ्या लावून पोलिसांनी नाकेबंदी केली असता या तरुणांनी जुना आग्रारोडवर जावून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात व्यापारी संकुलाकडे कुच करत दगडफेक सुरू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरून दुकाने पटापट बंद झाली. या प्रकाराची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधिक्षक लता दोंदे, शहर पोलीस निरिक्षक धुसर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत दगडफेक करणाऱ्या जमावास लाठीमार करत पिटाळून लावले. या घटनेने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.








