मालेगाव – तिरूपती बालाजीच्या दर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने निघालेल्या मालेगाव शहरातील चौघा तरुणांचा बीड उस्मानाबाद रस्त्यावर गुरूवारी (दि.२३) रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघाताचे वृत्त कळताच परिसरात शोककळा पसरली आहे. मालेगाव शहर व परिसरातील १८ जण टेम्पो ट्रॅव्हल क्रमांक एमएच ४१ एओ १५५४ ने तिरुपती बालाजी दर्शनासाठी निघाले होते. बीड उस्मानाबाद रस्त्यावर या तरूणांचा टेम्पो ट्रॅव्हल पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. यावेळी टेम्पोसमोर शरद देवरे (वडगाव), जगदीश दरेकर, सतीष सुर्यवंशी (दोघे रा. दरेगाव) व विलास बच्छाव (सायने) हे चौघे तरुण बसलेले होते. याच वेळी मागून येणाऱ्या एका आयशर ट्रक क्रमांक एमएच २० इजी १५१७ ने टेम्पोला जबर धडक दिली. यात टेम्पो ट्रॅव्हल समोर बसलेले चौघे तरूण जागीच ठार झाले. तर संजय सावंत, भरत पगार, गोकूळ शेवाळे हे तिघे जण जखमी झाले आहेत. या धडकेनंतर टेम्पो सात ते आठ फुट खोल खाली गेला. तर आयशर उलटला. मृत सर्व तरुण ४० ते ४५ वयोगटातील व्यावसायिक होते. कुटुंबातील कर्त्या तरुणांच्या निधनामुळे शहर व परिसरावर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेमुळे चाळीसगाव फाट्यावरील सर्व व्यावसायीकांनी आज स्वयंस्फूर्तीने बंद पाळला असून फाट्यावर शुकशुकाट होता. अपघाताचे वृत्त समजताच शहरातील जतीन कापडणीस, राजेंद्र पवार, सतीष गिते, भरत देवरे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत तरूणांचे शव दुपारपर्यंत मालेगावी आणण्यात येतील.