मालेगाव- प्लास्टिक कारखाना चालकांच्या वतीने शहरातील कारखाने कारखानदारांनी एकत्र येऊन शहराबाहेर एकाच जागेत उभारलेत तर ते सर्वांच्या सोयीसह शासनाच्या सोयी सुविधा पुरविण्यासाठी संयुक्तिक ठरेल असे मत राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
मालेगाव येथील शासकीय विश्रामगृहात प्लास्टिक कारखाना चालक व मालक यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मंत्री श्री भुसे बोलत होते. यावेळी नगरसेवक एजाज बेग यांच्या सह प्लास्टिक कारखानदार अल्ताफ बेग, जमिल भाई, रफिक भाई, युनूस मुल्ला, शफीउल्ला भाई, मन्सूर आलम सिराज आलम, शफील भाई, जमिल हसन, जिया शेख अल्लाउद्दीन, डॉ हलीम, असिफ भाई, फतेह अली, निहाल चक्कीवाले, शब्बीर भाई, मुसा भाई आदी उपस्थित होते.
प्रदूषण नियंत्रित ठेवून निसर्गाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगताना मंत्री श्री भुसे म्हणाले, प्लास्टिक कारखाने हे शहराच्या बाहेर मोकळ्या ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे आहे यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल व कारखानदारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. असे आश्वासनही मंत्री भुसे यांनी उपस्थितांना दिले.
नगरसेवक एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली कृषी मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन आपल्या समस्या व प्रश्न मांडताना प्लास्टिक कारखाना चालकांनी त्यांचे कारखाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे त्याच बरोबर प्लास्टिक उद्योग ऐवजी इतर दुसऱ्या उद्योगांसाठी महापालिकेकडून परवानगी मिळणे, शहरी हद्दीतून कारखाने स्थलांतरित करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळावी. वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेली वाढीव वीज देयकांमध्ये सवलतीच्या दराने आकारणी करण्यात यावी, अशा प्रकारच्या विविध समस्या व प्रश्न मांडण्यात आले. यावर श्री. भुसे म्हणाले, प्लास्टिक कारखानदार हे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करून पर्यावरणाच्या रक्षणाबरोबर निसर्गाचा समतोल राखून एक प्रकारे देश सेवा करीत आहेत. राज्यातीलच नव्हे तर देशभरातील प्लास्टिक कचरा स्वच्छतेचे मोठे काम या माध्यमातून होत असल्याने राज्य व केंद्र शासनाच्या ज्या काही सवलती, सोयीसुविधा व आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे कृषीमंत्री श्री. भुसे यावेळी म्हणाले, त्या व्यतिरिक्त कारखानदारांना चाळीसगाव फाटा, सायने एमअायडिसीसह अजंग- रावळगाव येथील एमआयडीसी मध्ये देखील प्लास्टिक उद्योगासाठी जागा राखीव ठेवण्यात आली आहे. त्या ठिकाणी देखील आपण आपले उद्योग सुरू करू शकतो. शहरी हद्दीतील प्लास्टिक कारखाने स्थलांतरित करणे, प्लास्टिक उद्योग ऐवजी इतर उद्योग सुरू करण्याबाबतची परवानगी मिळणे व कारखाने स्थलांतरित करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबतचे प्रश्न लवकरच निकाली काढून यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू असे देखील मंत्री भुसे यावेळी म्हणाले.