मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहर हे येथील कुशल कारागीर व त्यांच्यातील तंत्र कौशल्य आणि ‘जुगाड’ साठी ओळखले जाते. अशा विविध तंत्र – कौशल्य, जुगाड संबंधी प्रस्ताव आल्यास संबंधितांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे मार्गदर्शन करून संशोधन पेटंट प्राप्त करून दिले जाईल, असे आश्वासन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी येथे दिले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची व्यावसायिक शिक्षण व कौशल्यविकास विद्याशाखा आणि ‘मालेगाव मोटार गॅरेज टेलरिंग यशवंतराव फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील कृष्णा मंगल कार्यालय (संगमेश्वर – मोतीबाग नाका) येथे गुरुवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता तंत्रकौशल्य मूल्यांकन प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे बोलत होते. त्यांच्या व प्रमुख अतिथींच्या हस्ते यावेळी शहरातील दुचाकी, तीनचाकी व चारचाकी मेकॅनिक तसेच कापडावर हस्तकौशल्य व शिवणकाम करणाऱ्या महिलांसह एकूण ६७१ जणांना विद्यापीठातर्फे तंत्रकौशल्य मूल्यांकन प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू मा. प्रा. डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड, वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील, विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश देशमुख, व्यावसायिक शिक्षण व कौशल्यविकास विद्याशाखा संचालक प्रा. डॉ. राम ठाकर, विद्यापीठ अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्रचे वरिष्ठ सहाय्यक श्री. सोमनाथ जाधव, तंत्रकौशल्य मूल्यांकन कार्यक्रमाचे स्थानिक समन्वयक व संयोजक श्री. आतिक शेख, मालेगाव तंत्रनिकेतन प्राचार्य श्री. वाय. के. कुलकर्णी, श्री. डी. एस. गरुड, एशान शेख, मन्सूर अन्सारी, युसुफ खान, श्रीमती अनिता अवस्थी, श्रीमती पिंकी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.
आपल्या भाषणात बोलतांना पुढे मा. कुलगुरु प्रा. सोनवणे म्हणाले की मालेगावकरांचे चित्रपट निर्मिती प्रेम, मॉलिवूडची लोकप्रियता बघता आणि स्थानिक कलाकारांची मागणी लक्षात घेता त्यांना विद्यापीठातर्फे ‘फिल्म मेकिंगचा’ शिक्षणक्रम उपलब्ध करून दिला जाईल. येथील महिलांच्या हस्तकौशल्याने निर्मित वस्तूंचे नाशिक शहरात विद्यापीठातर्फे प्रदर्शन आयोजत करण्यात येईल, असे देखील आश्वासन कुलगुरु प्रा. सोनवणे यांनी यानिमित्ताने दिले. कार्यक्रमास शिक्षक आमदार श्री. सत्यजित तांबे व मालेगाव महानगरपालिका आयुक्त श्री. रवींद्र जाधव यांनीही भेट दिली. यावेळी आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की मुक्त विद्यापीठाने तंत्रकौशल्य प्रमाणपत्राद्वारे या कारागिरांची कुटुंब व समाजातील प्रतिष्ठा वाढवण्याचे कार्य केले आहे. तसेच या प्रमाणपत्राचा कारागिरांना नोकरी – व्यवसाय व व्यावसायिक कर्ज प्राप्तीसाठी लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी काबाडकष्ट करणाऱ्या कारागिरांना प्रमाणित करण्याचे काम विद्यापीठाने केले असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त श्री. रवींद्र जाधव यांनी उपस्थित महिलांनी बचत गट स्थापन करून शासकीय योजनांचा लाभ घेत आपली प्रगती साधावी असे आवाहन केले.
तंत्रकौशल्य मूल्यांकन कार्यक्रमाचे स्थानिक समन्वयक श्री. आतिक शेख यांनी सदर कारागिरांचा संपूर्ण शिक्षण कार्यक्रम हा केंद्र शासनाच्या आरपीएल अर्थात पूर्व शिक्षण कार्यक्रम (RPL – Recognition of Prior Learning) अंतर्गत आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. श्रीमती पिंकी शर्मा व श्रीमती अनिता अवस्थी यांची देखील भाषणे झाली. फिटर असलेल्या सलीम शेख या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. तत्पूर्वी प्रास्ताविकात विद्यापीठ विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रकाश देशमुख यांनी तंत्रकौशल्य मूल्यांकन कार्यक्रम व त्याअंतर्गत घेण्यात आलेली परीक्षा याविषयी माहिती दिली.
शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्री. शकील अहमद (जीवरक्षक), श्री. अक्रम खान (चित्रपट – मालिका निर्मिती), डॉ. आरिफ बेग (वैद्यकीय), श्रीमती कविता कासलीवाल व श्रीमती मुमताज शेख (समाजसेवा) यांचा सत्कार करण्यात आला. सदर शिक्षण कार्यक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत विशेष नैपुण्य प्राप्त विद्यार्थी सलीम शेख, नासिर बिन अब्दुल्लाह, मोहंमद कुरेशी, खालिद चाऊस, अनीस शेख, मोमीन कासीम रझा, सलीम सय्यद, सादिक शेख, मोहंमद दाऊद, मोहंमद ताहिर, अबुझर रंगारी, मनोज खैरनार, वसीम मन्सुरी, हर्षल निकम, मुश्ताक जिलानी (सर्व मेकॅनिक) तसेच आशा जगताप, तस्लीम मोहंमद, तेहसीन अल्ताफ, वैशाली पवार, ज्योती सोंगरा, मनीषा नवरकर, अश्विनी वाल्हे (शिवणकाम) यांचा देखील सत्कार करण्यात आला.
मालेगावातील कौशल्य प्राप्त महिलांनी निर्मित केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन कार्यक्रम स्थळी भरवण्यात आले होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मानसी महाजन यांनी तर आभारप्रदर्शन कुलसचिव श्री. दिलीप भरड यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीताने करण्यात आली होती तर समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.