इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याचा ठपका ठेवत मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांना निलंबित करण्यात आले. तहसीलदार देवरे, नायब तहसीलदार धारणकर यांची विभागीय चौकशी होणार आहे. जन्म दाखले देतांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. महसूल विभागाचे सह सचिव अजित देशमुख यांनी निलंबनचे आदेश काढले आहे.
सोमय्या यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मालेगाव बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा! तत्कालीन तहसीलदार नितीन देवरे व नायब तहसीलदार संदीप धरणाकर यांचं निलंबन! महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचे मी स्वागत करतो!
तर शासनाच्या आदेशात म्हटले आहे की, उक्त पदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशाप्रमाणे न करता आणि शासकीय कामकाजात पुरेशे गांर्भीय न दर्शविता जन्म प्रमाणपत्रे / दाखले निर्गमित केल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूरी करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीअन्वये विभागीय चौकशीची कारवाई करतांना निलंबित करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन तात्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.