मालेगाव:- येथील महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून मानधन तत्वावर काम करणाऱ्या पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कामावरून कमी करणाऱ्या महापालिका प्रशासनाच्या निर्णया विरोधात आज मालेगाव बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रदेश सचिव आनंद आढाव यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी मनपा प्रवेशद्वार येथे ठिय्या आंदोलन केले.
यावेळी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, शहराध्यक्ष सुनील पवार, मध्य विधानसभा अध्यक्ष जहुर भाई, जिल्हा महासचिव राजू जाधव, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पाथरे यांच्या सह मोठया संख्येने महिला कर्मचारी वर्ग सहभागी झाले होते.निवेदनात नमूद करण्यात आले की, सर्व सफाई कामगार हे गेल्या अनेक वर्षांपासून मनपाच्या सेवेत मानधन तत्वावर काम करत आहेत. यांनी कोरोना महामारीच्या काळातही जीवावर उदार होऊन शहरात सफाई कामे करीत आहेत. परंतु, काही मनपा अधिकारी व प्रतिनिधी यांनी खाजगी मक्तेदाराच्या फायद्यासाठी सफाईचे काम मानधन कर्मचारी यांच्या कडून काढून ते खाजगी ठेकेदार कडे वर्ग करण्याचा घाट घातला आहे. यामुळे या कर्मचाऱ्यांवर व कुटूंबावर उपवासमारीची वेळ येणार आहे.
शासनाने ३ जून २०२१ रोजी अध्यादेश काढून या सर्व मानधन कर्मचाऱ्यांना आस्थापना सेवेत सामावून सामावून घ्यावे, असा आदेश दिला असतानाही त्यांना सेवेत रुजू केले नाही. बसपाच्या वतीने याबाबत वेळोवेळी मनपा आयुक्तांना निवेदनही देण्यात आली आहे. जर जबरदस्तीने दडपशाहीने मानधन कर्मचाऱ्यांचा बळी दिला तर बसपाच्या वतीने लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशारा आनंद आढाव यांनी दिला आहे.