मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगावमध्ये आज पहाटे साडे तीन वाजेच्या दरम्यान मंत्री दादाजी भुसे यांचे पुत्र अविष्कार भुसे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. अविष्कार भुसे हे दोन मित्रांसोबत मालेगाव सटाणा रस्त्यावर दाभाडी गावाजवळ चिंतामणी गणपतीचे दर्शन घेऊन मालेगावकडे परत येत असताना टेहेरे चौफुली जवळ ही घटना घडली.
या घटनेत संशयित दोन वेगवेगळ्या गाडीमधून आले. त्यांना जोरजोरात हॉर्न वाजवून भुसे यांच्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. तर दुसऱ्या गाडीतल्या संशयितांनी भुसे यांच्या गाडीच्या बोनेटवर आरडा ओरडा करत रॉड मारला. या सर्व चकमकीत भुसे यांची गाडी डीव्हायडर मध्ये घुसून त्यांच्या गाडीचा पुढचा टायर फुटून अपघात झाला.
हे संशयित गो तस्कर असल्याचा संशय आहे. त्यांचीही गाडी डीव्हायडरला ठोकल्या गेल्याने त्या ठिकाणी स्थानिक रहिवासी धावून आले. त्यानंतर त्यांनी संशयितांना पकडले. त्यातील काही जण पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना फोन करून बोलावून घेतले. यात एका गाडीमधून गो तस्कर करण्याचे दोर, लाठ्या काठ्या असे साहित्य आढलून आले. हे गो तस्कर असतील असा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. या घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.