मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यात भीषण रस्ते अपघात झाला आहे. नांदगाव-मालेगाव राज्यमार्गावर नाग्यासाक्या धरणासमोर हा अपघात झाला आहे. मध्यरात्री एक ते दीडच्या वाजेच्या सुमारास मारुती ईको कार पुलावरुन थेट नदीत कोसळली. या अपघातात लहान बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, ७ जण जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नांदगावमधील नाग्या-साक्या पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. जालना येथील विवाह सोहळा आटोपून ईको कारने १० जण परतत होते. मध्यरात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास ही कार पुलावरुन थेट नदीत कोसळली. या अपघातात ४ वर्षांच्या बालिकेसह तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, ७ जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर मालेगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुलाला कठडे नव्हते. तसेच, रात्रीच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर अॅम्ब्युलन्स बोलवून जखमींना तातडीने नांदगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, तेथे प्रथमोपचार करुन पुढील उपचारासाठी या सर्वांना मालेगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Malegaon Nandgaon Accident Eco Car fell in River