वृक्षारोपण – एक आत्मिक आनंद
– प्रा. डॉ. प्रविण पाटील (वनस्पतीशास्र विभाग, मसगा महाविद्यालय, मालेगाव)
सुमारे तीस वर्षापूर्वी शाळेत असताना मित्राच्या हातात हात घेऊन 15 ऑगस्ट व 26 जानेवारी च्या दिवशी गावात प्रभात फेरी निघायची, तेव्हा विविध घोषवाक्य म्हणत गावाला प्रदक्षिणा घालायचो त्यात एक घोषवाक्य होते ” एक मूल एक झाड लावलेच पाहिजे” पण प्रत्यक्षात मात्र झाड लावलेच नव्हते. माझ्या सारखीच परिस्थिती अनेक विद्यार्थ्यांची असावी म्हणूनच आज तीस वर्षानंतर देखील या वृक्षांची संख्या वाढलेली दिसत नाही किंबहुना कमी झालेली दिसते. वाढते तापमान, जंगलतोड, कॉंक्रिटीकरण, औद्योगिकीकरण असे अनेक कारणे आहेत वृक्षांची संख्या कमी होण्याची. ही सर्व कारणे पुढे करून मंथन केले जाते. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात या विषयांवर व त्यातून विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाची माहिती पटवण्याचा प्रयत्न केला जातो पण तरीही वृक्षांची संख्या वाढण्याऐवजी कमी होत आहे, याचे कारण म्हणजे वृक्ष वाढ करण्यासाठी या सर्व गोष्टींपेक्षा प्रत्यक्ष वृक्ष लागवडीची गरज जास्त आहे हे समजायला बराच वेळ निघून गेला.
नंतरच्या काळात वनस्पतीशास्त्र विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतले त्यानंतर याच विषयात संशोधन केले त्या निमित्ताने नेहमीच वृक्षांच्या सान्निध्यात राहून वृक्षांच्या बराच अभ्यास केला पण प्रत्यक्षात वृक्षलागवड मात्र केलीच नाही. नंतरच्या काळात वाढते तापमान आणि कमी पर्जन्यमान या गोष्टी सतत विचारमंथन करायला लावणाऱ्या होत्या. वृक्ष लागवड हा एकमेव उपाय या सर्वांवर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड झाली पाहिजे असे मनोमन वाटत होते. महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव येथे वनस्पतिशास्त्र विभागातर्फे काही विशेष उपक्रम राबवावा अशी जबाबदारी माननीय प्राचार्य शिरुडे सर व विभाग प्रमुख सोनवणे सर यांनी माझ्याकडे सोपवली. काहीतरी समाजोपयोगी उपक्रम हाती घ्यावा अशी माझी मनोमन इच्छा होतीच म्हणून सीड ब्रॉडकास्टिंग (Seed Broadcasting) हा उपक्रम राबवणार असे मी ठरवले. सीड ब्रॉडकास्टिंग हा उपक्रम नेमका काय आहे याची माहिती बऱ्याच लोकांना नव्हती. 20 जुलै 2020 च्या द इंडियन एक्सप्रेस चा एक लेख मी वाचला होता त्यात जंगल वाढीसाठी हरियाणा सरकारने ड्रोन चा उपयोग करून सुमारे शंभर हेक्टर जंगल भागात बीज प्रसारण केले होते, पडीत जमिनीत व जंगली भागात विविध वनस्पतींच्या बियांचे प्रसारण करून जंगल वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो, यातूनच मला या उपक्रमाची प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांना उपक्रमाची माहिती दिल्यानंतर त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला व हा उपक्रम राबवावा हे सर्वानुमते ठरले.
या उपक्रमासाठी मालेगाव परिसरातील विविध भागात वाढणाऱ्या स्थानिक वनस्पतींच्या बिया संकलन करणे गरजेचे होते त्यासाठी विद्यार्थ्यांनी चिंच, आंबा, आवळा, सिताफळ, रामफळ, निंब, जांभूळ, बोर, बाभूळ अशा अनेक झाडांच्या सुमारे 25 हजार बियांचे संकलन केले. ज्या तरुणाई ला आपण बेजबाबदार समजत असतो ती चांगल्या कामांसाठी एकवटते हे विद्यार्थ्यांनी सिद्ध केले. माझ्या विभागातील सहकारी प्रा.अतुल वाघ, जाधव सर, शास्त्री सर, व मामुडे सर यांच्या सहकार्याने मालेगाव परिसरातील तळवाडे, गाळणा किल्ला व वरदडी (उमराणे) या भागांमध्ये जाऊन संकलन केलेल्या 25000 बीयांचे रोपण विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही केले. सुरुवातीला साधारण वाटणारा हा उपक्रम महाविद्यालयातील प्राध्यापकांना देखील आवडला व तो महत्त्वाचा देखील वाटला म्हणून अनेक विभागातील प्राध्यापक स्वखुशीने आमच्याशी जोडले गेले व या उपक्रमाचे रूपांतर मोहिमेत झाले.
यानंतर आम्ही प्रत्यक्ष वृक्षारोपणाचा उपक्रम हाती घेतला त्याअंतर्गत महाविद्यालयातील ज्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस असेल त्याच्या हस्ते किमान एक वृक्ष लावून घ्यावे अशी संकल्पना माझ्या डोक्यात आली, माझा मित्र प्रा.राज त्रिभुवन याचा एक जानेवारी रोजी वाढदिवस असतो म्हणून एक जानेवारी रोजी पहिल्या वृक्षाचे रोपण त्याच्या हस्ते करून घेतले आणि या उपक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर अनेक मान्यवरांनी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले व बघता बघता ओस पडलेला परिसर हिरव्यागार झाडांनी बहरून गेला. वृक्षारोपण करून काम संपत नसते तर लावलेली झाडें जगविणे जास्त मोठे काम असते याची जाणीव माझ्या विद्यार्थ्यांना झाली होती म्हणूनच विद्यार्थी महाविद्यालयात आल्यावर न सांगता झाडांना पाणी घालताय. विद्यार्थांमधील ही आत्मीयता पाहून मा. प्राचार्य शिरुडे सर यांनी जागतिक महिला दिनाच्या दिवशी आमच्या विद्यार्थिनींचा विशेष कौतुक करून सत्कार केला. इतरांच्या दृष्टीने हा उपक्रम फार महत्वाचा नसेल कदाचित पण प्रत्यक्षात या उपक्रमात काम करताना जी माणसे जोडली गेलीत त्यांचा चेहर्यावरचा आनंद मात्र मला खूप काही समाधान देत होता. वृक्षारोपण करावे हे प्रत्येकालाच वाटत असते आणि तो जिव्हाळ्याच्या विषय देखील आहे पण प्रत्यक्षात मात्र ते आपण करू शकत नाही याची खंत सर्वांनाच आहे. अशा उपक्रमातून संधी उपलब्ध करून दिल्यास लोक त्यात आनंदाने सहभागी होतात याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला . या पलीकडे आपण लावलेले झाड वाढत आहे हे पाहून प्रत्येक माणसाला होणारा आत्मिक आनंद पैशाने विकत घेता येणार नाही याची जाणीव मला झाली व वृक्षरोपण हा केवळ एक उपक्रम नसून तो एक आत्मिक आनंद आहे हे मी अनुभवले.