नाशिक – मालेगांव उपमाहिती कार्यालयातील कर्तव्यनिष्ठ माहिती सहाय्यक श्री. मनोहर पाटील यांचे काल (गुरूवार) सायंकाळी मालेगांवहून धुळ्याला परतताना अपघाती निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई,वडील, पत्नी, मुलगा, मुलगी दोन भावंडे असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शन दुपारी 12.00 वा.राहते घरी कालिकामाता नगर, धुळे येथे ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1.00 वाजता कुमारनगर स्मशानभूमी, धुळे येथे त्यांच्यावर अंतीम संस्कार केले जाणार आहेत.
पालकमंत्री छगन भुजबळ यांची श्रद्धांजली
मालेगांव उपमाहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांच्या अपघाती निधनाने प्रसारमाध्यमे आणि शासन संवादातील दुवा हरपला असून त्यामुळे जनसंपर्क क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली आहे. मालेगांव च्या कोरोना संकटात मनोहर पाटील यांनी केलेले काम जिल्ह्यातील माध्यम सृष्टीला सदैव संस्मरणात राहील. नुकताचा राज्याचे माहिती जनसंपर्क सचिव यांच्या हस्ते त्यांचा त्यासाठी गौरवही करण्यात आला होता.
मृदभाषी, दांडगा जनसंपर्क, वक्तशीर, अत्यंत सचोटीची कर्तव्यनिष्ठा आणि विनम्र असणाऱ्या मनोहर पाटील यांचा वृत्तांकनात, लेखनात हातखंडा होता. ज्यांना शासकीय जनसंपर्काची खरी नस समजली होती अशा राज्याच्या माहिती संवर्गातील मोजक्या संवादकांपैकी ते एक होते. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसोबतच शासकीय जनसंपर्क क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना या संकटातून बाहेर पडण्याचे बळ देवो, मनोहर पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशाही भावना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केल्या आहेत.