मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह संतप्त कार्यकर्त्यांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करीत आयुक्त भालचंद्र गोसावी यांच्या दालनासमोर फलकाला काळे फासून निषेध केला. मालेगावच्या मुकुंदवाडी भागातील अतिक्रमण काढण्यास महापालिका प्रशासन हेतुपुरस्कर टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विकासकामात टक्केवारी घेतली जाते. लाखो रुपये घेऊन स्थानिकांना महापालिका सेवेत डावलले जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. लवकरात लवकर मुकुंदवाडी भागातील अतिक्रमण काढण्यात आले नाही तर यापुढे आयुक्तांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशाराही यावेळी शेख यांनी दिला.