मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील अठरा वर्षीय युवकाचे अपहरण करून ५० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या एका संशयिताला मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिनेस्टाइल सापळा रचून पोलिसांनी या तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. यातील एक जण मात्र फरार झाला आहे. मालेगाव पोलिसांच्या चतुराईमुळे युवकाची सुटका झाली आहे.
मालेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुबोध आनंद कापडे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोयगाव परिसरातील डी. के. चौकातून त्याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याच मोबाईलवरून संशयितांनी कापडे कुटुंबियांना फोन केला. तसेच, त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे दिले नाही तर युवकाला ठार मारण्याची धमकी संशयितांनी दिली. या घटनेमुळे कुटुंबियांसह शहरात चिंतेचे वातावरण होते.
याप्रकरणी आनंद वाल्मिक कापडे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तीन पथके तयार केलीय तपास यंत्रणांची चक्रे फिरविली आणि पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली. त्यानंतर कापडे कुटुंबियांना संशयिताशी संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार, जुना आग्रा रोडवरील एका हॉटेलवर खंडणीचे पैसे घेण्यासाठी बोलविले. याठिकाणी पोलिस आधीच सापळा लावून बसले होते. तेथे संशयित येताच त्याला ताब्यात घेतला. मात्र, त्याचा साथीदार फरार झाला आहे. ताब्यात घेण्यात संशयितांकडून अपहरणासाठी वापरण्यात आलेला कोयता, गावठी पिस्टल व ६ जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. या गुन्ह्यात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
यांनी केली कामगिरी
नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगाव अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, पोलीस उपअधीक्षक तेजवीरसिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा, मालेगाव कॅम्प पोलिस स्टेशन आणि फिरते पोलिस पथक अशी तीन पथकांनी एकत्रितरित्या तपास केला. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सागर शिंपी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील, पोलीस नाईक शरद मोगल, विजय वाघ, नयन परदेशी, दत्ता माळी, चंद्रकांत कदम, गौतम बोराडे, मनीषा पवार यांनी या तपासात मोलाची भूमिका बजावली.