मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील पवारवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकत १५ हजार ८०० कुत्ता गोळीचे पाकीट व नशा येणारे सीरपच्या बाटल्या असा जवळपास २ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत याप्रकरणी विविध ठिकाणाहून पाच जणांना ताब्यात घेतले आहे.
वर्षभरापूर्वी मालेगावमध्ये अन्न औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली होती. यावेळी हजारो रुपयांचा कुत्ता गोळीचा साठा सापडडा होता. यावेळी केलेल्या तपासात कुत्ता गोळी शहरात येण्याचे कनेक्शन शोधण्यात आले होते. त्यावेळेस मध्यप्रदेश आणि गुजरातचे कनेक्शन दिसून आले होते. मालेगावमध्ये कुत्ता गोळीचे ठिकठिकाणी एजंट असल्याचे त्यावेळेस समोर आले होते. या कारवाईनंतर सुध्दा छोट्या मोठ्या कारवाया होत गेल्या. पण, कुत्ता गोळीची विक्री काही थांबली नाही.
मालेगाव कुत्ता गोळीचे हब
कुत्ता गोळीचे हब म्हणून मालेगाव शहराची ओळख झाली आहे. अनेक तरुण कुत्ता गोळीच्या सेवनाने व्यसनी बनत आहे. दारूची नशा करण्यासाठी जास्त पैसे लागतात. पण, कुत्ता गोळीची नशा कमी पैशात होते. अवघे दोन ते तीन रुपयांना ही कुत्ता गोळी मिळते. काही क्षणातच या कुत्ता गोळीची नशा संपूर्ण अंगात भिनते त्यामुळे कुत्ता गोळीची नशा करणारी संख्या मालेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी विक्रीसाठी मनाई
१८ ते ३० वर्ष वयोगटातील बहुतांश तरुणाई या नशेच्या आहारी गेली आहे. कुत्ता गोळीचं खरं नाव अल्प्रलोजोम असे आहे, गोळीच्या अतिसेवनाने शरीर बधीर होते. याशिवाय मानसिक संतुलनही बिघडण्याची शक्यता आहे. या गोळीत उत्तेजक पदार्थ असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीसाठी मनाई आहे. मात्र काही स्टोअर्समध्ये या गोळ्या सर्रासपणे मिळतात.