मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे एका ठकबाज नवरीचा कारनामा समोर आला आहे. लग्न करुन आपल्या नवऱ्याला गंडवणाऱ्या या महिलेला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सर्वप्रकरणात मोठे रॅकेट असण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार, पोलिस पुढील तपास करीत आहेत.
नव-याला फसवून फरार झालेली बायको दुसरे लग्न करीत होती. त्याचवेळी पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतले आहे. तिच्यावर फसवणुकीचा गुन्हाही दाखल केला. तालुक्यातील दाभाडी येथील एका तरुणाचे तीन महिन्यापुर्वी लग्न झाले. पण, त्यानंतर बायको फरार झाली होती. त्यानंतर ती दुस-याशी लग्न करत असतांना सापडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठकबाज महिलेने दाभाडी येथील एका शेतकऱ्याला आपल्या गळाशी लावले. त्याच्याकडून अडीच लाख रुपये घेतले. त्याच्याशी लग्न करुन ती सासरी आली. मात्र, तेथील १० हजारांची रोख रक्कम आणि ८५ हजार रुपयांचे दागिने घेऊन ती पळाली. तिची बरीच शोधाशोध केली पण सापडली नाही. अखेर आपण गंडवले गेल्याचे शेतकऱ्याला कळून चुकले. त्याने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हीच ठकबाज महिला तालुक्यातील दसाने या गावात दुसरे लग्न करीत असल्याची वार्ता पोलिसांना समजली. लग्नासाठी गावातून गेलेल्या पाहुण्यांनी या ठकबाज महिलेला ओळखले. त्यांनी पूर्वी लग्न झालेल्या दाभाडीच्या तरुणाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने दाभाडीच्या तरुणाने मालेगाव तालुका पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने सापळा रचला आणि थेट पथकाने या ठकबाज महिलेला अटक करत तिच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शेतक-यांच्या मुलांचे लवकर लग्न होत नसल्याने अनेक दलाल लग्न होत नसलेल्या मुलांच्या कुटुंबांना हेरतात. त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि काही दिवसानंतर मुलगी फरार होते. पुन्हा दुस-या बरोबर तिचे लग्न लावून देतात. अशा टोळीचा पोलिस आता शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसात असे अनेक प्रकार समोर आले असून त्यात मालेगाव तालुक्यातील ही घटना समोर आली आहे.