मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक पथकाने (एटीएस) योगी आदित्यनाथ यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पाच नेत्यांना फसवण्यासाठी दबाव टाकल्याचा खुलासा या प्रकरणातील एका साक्षीदाराने विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या न्यायालयासमोर (एनआयए) केला आहे. मुंबई पोलिस दलाचे माजी आयुक्त परमबीर सिंह त्या वेळी एटीएसचे अतिरिक्त आयुक्त होते. या प्रकरणातील एक आरोपी समीर कुलकर्णी याने एका वृत्तवाहिनीला वरील साक्षीदाराच्या खुलाशाबद्दल माहिती दिली आहे.
समीर कुलकर्णीच्या माहितीनुसार, या साक्षीदाराने न्यायालयाला सांगितले की, परमबीर सिंह आणि राव नावाच्या एका अधिकार्याने या प्रकरणात योगी आदित्यनाथ यांच्यासह आरएसएसच्या इंद्रेश कुमार, स्वामी असीमानंद, काकाजी ऊर्फ देवधर यांची नावे घेण्याचा दबाव साक्षीदारावर दबाव टाकला होता. त्याला एटीएसच्या मुंबई आणि पुण्यातील कार्यालयामध्ये अवैधरित्या रोखून ठेवण्यात आले होते. असे न केल्यास सुटका केली जाणार नाही. इतर आरोपींसारखे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचा दावा केला. या साक्षीदाराने आपल्या पाच पानांचा जबाब एनआयए न्यायालयात नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास एनआयकडे सुपूर्द करण्यापूर्वी फिर्यादी पक्षाकडून सादर झालेल्या या साक्षीदाराचा जबाब एटीएसने भादंविच्या कलम १६१ अंतर्गत नोंदवला होता.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावमध्ये मोटरसायकलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र एटीएसकडे सोपविण्यात आला होता. एटीएसने भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा, लेफ्टिनंट कर्नल पुरोहित, समीर कुलकर्णी, अजय राहिलकर, रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांना आरोपी केले होते. या सर्वांवर खुनाचा प्रयत्न, दहशतवादाच्या अनेक कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना जन्मठेपेपासून मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा होऊ शकते.
या प्रकरणात एटीएसने जवळपास २२० साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. एनआयएकडे तपास आल्यानंतर आतापर्यंत त्यापैकी १५ साक्षीदारांनी आपले जबाब फिरवले आहेत. एनआयएच्या कोठडीत असताना दडपशाही करण्यात आल्याचा असा आरोप आरोपी साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा केला आहे. त्यांनी अनेकदा खुलेआम परमबीर सिंह यांचे नाव घेतले आहे. परंतु सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात स्वतः परमबीर सिंह यांच्यावर आरोप होत आहेत.