मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री दादा भुसे यांना जोरदार दणका बसला आहे. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी भुसेंना चांगलाच धोबीपछाड दिला आहे. हिरे यांच्या पॅनलचे तब्बल १० उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे भुसे यांनी तब्बल १५ वर्षांची सत्ता गमावली आहे.
मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कारण, दादा भुसे यांनी ठाकरे गटात बंडखोरी केली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटात दाखल झाले. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या आहेत. तर, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते हिरे यांनी मालेगावात उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित केली. यावेळी ठाकरे यांनी भुसेंसह सर्वच बंडखोरांचा चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर ही निवडणूक झाल्याने त्यात काय निकाल लागेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.
उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. या निवडणुकीत अद्वय हिरे यांच्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलचा सोसायटी गटातून ११ पैकी १० जागांवर विजय झाला आहे. तर एका जागेवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या आपलं पॅनलचे उमेदवार चंद्रकांत शेवाळे निवडून आले आहेत.
हिरेंनी भुसे यांना चांगलंच धोबीपछाड दिल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. मालेगावात भुसे विरोधी आणि खासकरुन ठाकरे यांच्या सहानुभूतीचा विचार झाला असल्याचे बोलले जात आहे.
— Dr. Advay Hiray-Patil (@advay007) April 28, 2023