मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उपनेते डॉ अद्वय हिरे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे विनोद चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आज या दोन्ही पदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलविण्यात आली होती.
हिरे व चव्हाण यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केला. पालकमंत्री दादा भुसे यांच्या ताब्यात असलेली बाजार समितीची सत्ता हिरे यांनी १४ उमेदवार निवडून आणत आपल्याकडे खेचली होती.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मालेगावमध्ये ही पहिलीच निवडणूक होती. त्यात हिरे – भुसे वादाची किनार असल्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, ही निवडणूक बिनविरोध झाली.