मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरात लातलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात तब्बल तीन जण सापडले आहेत. विशेष म्हणजे, मालेगाव शहर पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक सुरेशकुमार ताराचंद घुसर याच्यासह पोलिस शिपाई आणि एजंट यांचा समावेश आहे. या तिघांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भाऊ आणि त्याचे दोन मित्र हे रात्रीच्या सुमारास जेवण करून घरी परतत होते. त्याचवेळी ते एमडी या नशेच्या पदार्थाशी संबंधित आहेत, या कारणावरून त्यांना मालेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांचा भाऊ व त्याचे दोन मित्र यांचे साठी सुरुवातीस एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर ही रक्कम पन्नास हजार रुपये करण्यात आली. अखेर तडजोडी अंती तक्रारदार यांचे भावासाठी वीस हजार रुपये मागणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने सापळा रचला. त्यात पोलिस निरीक्षक सुरेशकुमार ताराचंद घुसर, पोलिस नाईक आत्माराम काशिनाथ पाटील आणि खासगी एजंट सैय्यद राशीद सैय्यद रफिक ऊर्फ राशीद बाटा हे तिघे रंगेहाथ सापडले. त्यानुसार या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कार्यवाही एसीबीकडून सुरू आहे.
दरम्यान, सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे. एसीबीचे संपर्क क्रमांक असे 0253- 2575628, 0253- 2578230. किंवा टोल फ्री क्रं. 1064
Malegaon Anti Corruption Raid Bribe 3 Trap
Police PI Crime