मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील चिंचवे येथून साक्री येथे विवाह समारंभासाठी जाणाऱ्या वऱ्हाडाच्या खासगी बसचा धाकड बारीत अपघात झाला. या अपघातात बस बारीत कोसळली. यावेळी वाहनाने घेतलेल्या चार ते पाच पलटीमुळे वाहनातील दोन वऱ्हाडींचा मृत्यू झाला असून अन्य १० हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. धाकड बारी (म्हसदी ) जवळ बस पोहचताच अपघाती वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस बारीत कोसळली. चालकाने धावत्या बसमधून बाहेर उडी घेतली. या अपघातात मखमलाबाई ह्याळीज (वय ६०), मयुरी बोरसे (वय ११) या दोघांचा मृत्यू झाला असून अन्य प्रवासी जखमी आहेत. जखमींमधील वर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु असून पालकमंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जावून जखमींची विचारपूस केली.