मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसच्या सर्वच्या सर्व म्हणजे २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात हे सर्व जणांनी हातावर घड्याळ बांधले आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये महापौर ताहेरा शेख यांच्यासह २८ नगरसेवकांचा समावेश आहे. महापौरांसह प्रथमच एवढ्या नगरसेवकांनी पक्षांतर केल्याने ही बाब राज्यस्तरावर चर्चेची ठरत आहे. तसेच, महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसला राष्ट्रवादीने मोठा शह दिल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसचे माजी आमदार रशिद शेख यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रशिद हे महापौर ताहेरा यांचे पती आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर शेख म्हणाले की, मालेगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास आहे. गेल्या दोन वर्षात मालेगावच्या विकासासंदर्भात काहीही विकासकामे झालेली नाहीत. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. राज्याचे ऊर्जा खाते काँग्रेसकडे आहे. मात्र, मालेगावसाठी काहीही ठोस प्रयत्न होत नाहीत, हे लक्षात आल्यानेच आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्याचे शेख यांनी स्पष्ट केले.
https://twitter.com/NCPspeaks/status/1486648257887412226?s=20
रशीद शेख यांचे पुत्र आसीफ शेख यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता मोठ्या प्रमाणात नगरसेवकांची फौज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाली आहे. या पक्षांतरामुळे मालेगावात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी बळकट झाली आहे. तर, काँग्रेस दिवसेंदिवस कमजोर होत आहे.