मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील जनता को -ऑपरेटिव्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कॅशियरने संगनमत करून २८ लाख ८० हजाराचा केलेल्या अपहारप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या अपहाराची बातमी खातेदारांमध्ये पसरल्यानंतर खळबळ निर्माण झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी इम्तियाज अहमद अहमदउल्ला अन्सारी व कॅशियर जावेद अक्तर सिद्दीक अहमद यांनी हा अपहार केल्याचा आरोप आहे.
या बँकेचे इस्लामपुरा भागात मुख्य कार्यालय असून त्याच्या स्ट्रॅागरुममधून या रक्कमेचा अपहार झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे निरीक्षक अधिकारी चिरंजीव पल्लव यांना कॅश बुकच्या शिल्लक रक्कमेत तफावत आढळल्यानंतर हा अपहाराचा प्रकार समोर आला. बँकेच्या स्ट्रॅागरुमच्या दोन चाव्या पैकी एक चावी इम्तियाज अहमद तर दुसरी चावी कॅशियर जावेदकडे होती. दोन्ही चाव्यांचा वापर केल्यानंतरच स्ट्रॅागरुम उघडत होते. त्यामुळे येथील रक्कम कमी आल्यामुळे त्यांच्यावर अपहर केल्याचा आरोप झाला.
असा झाला भांडाफोड
स्ट्रॅागरुमच्या लोखंडी तिजोरीत ५०० रुपयांचे बंडल ठेवलेल्या कप्प्यात मागील बाजूला २० रुपयांच्या नोटांचे बंडल ठेवले. सर्व नोटा ५०० रुपयांच्या असल्याचे भासविले. मात्र, शिल्लक रोकडची प्रत्यक्ष मोजणी झाल्याने या अपहराचा भांडाफोड झाला.