संक्रांतीत अंधश्रद्धांना थारा नको…
या वर्षीची संक्रात भारी आहे. अमूक दिशेकडून ती तमूक दिशेकडे जात आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्र परिधान केलेले आहे. तिच्या हाती अमुक एक शस्त्र असून, तिची नजर तमूक दिशेला आहे. ती ज्या दिशेकडून निघाली आहे. तेथील विविध पिडा ती सोबत घेऊन निघाली आहे. त्यामुळे ती ज्या दिशेकडे जात आहे, तेथील लोकांना ती महागाई, रोगराई, विविध संकटं अशा स्वरूपात ती पीडा देणार आहे. तिने परिधान केलेल्या वस्त्राचा पिवळा रंग हा अशुभ आहे. म्हणून त्या रंगाचे वस्त्र जो परिधान करेल, त्याला त्रास होणार आहे. असा मेसेज सोशल मिडीयात फिरत आहे.
कुणाच्यातरी स्वप्नात देवी आली. त्या देवीने सांगितले की, कुठेतरी झोपडपट्टीत लहान मुलीच्या स्वरूपात ती जन्म घेणार आहे आणि जे धर्माचा नाश करतील. त्यांचा नाश ती लहान मुलगी करणार आहे. विशेष म्हणजे वरील सर्व मेसेज जो फक्त वाचेल पण पुढे फॉरवर्ड करणार नाही, त्याचे नक्की मोठे नुकसान होईल. जो फॉरवर्ड करेल त्याला विविध प्रकारे मोठा लाभ होईल, असेही या मेसेज मध्ये नमूद आहे. अशा प्रकारच्या अवैज्ञानिक, अंधश्रद्धायुक्त व भितीदायक अफवा प्रसार माध्यमातून सध्या फिरताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे संक्रातीला स्त्रीलिंगी संबोधून सर्व अंधश्रद्धायुक्त, अवैज्ञानिक आणि भितीदायक कर्मकांड केवळ महिलांच्याच माथी मारण्याचा हा कुटील डाव आहे, हेही लक्षात येते. मग हे सर्व संकट टाळायचे कसे तर, अमुक एका दैवताची पूजा- आराधना करा, विशिष्ट कर्मकांड करा, असा दैवी तोडगाही मेसेज मध्ये सांगितला आहे. खरंतर, मेसेज मधील या सर्व अवैज्ञानिक गोष्टी आहेत. त्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. या कालावधीत सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच त्याला उत्राण किंवा संक्रांत म्हणतात. हा कालावधी थंडीचा असल्याने या काळात प्रोटीन युक्त उष्ण व पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरते. म्हणून तिळगुळाला अधिक महत्त्व आहे.
तिळगुळ घेण्याच्या निमित्ताने समाजातील सुसंवाद वाढावा, मनोमिलन घडावे, प्रेम-स्नेह वृद्धींगत व्हावा, वैचारिक घुसळण व्हावी, अशा स्वरूपाच्याच ‘वाणाची’ देवाण-घेवाण व्हावी, हा विधायक उद्देश मकर संक्रांत साजरी करण्यामागे आहे. आजच्या अगतिक, अस्थिर, असुरक्षित समाजात एकोपा वाढविणाऱ्या, मानसिक आधार देणाऱ्या, समन्वय व सहिष्णुता यांची रुजवणूक करणाऱ्या या मूल्यांची फार मोठी गरज आहे. ती संक्रांती सारख्या सण-उत्सवातून जाणीवपूर्वक भागवली जावी. म्हणून संक्रांत साजरी करताना अवैज्ञानिक कर्मकांडांना, अंधश्रद्धांना, अफवांना अजिबात थारा देऊ नये, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे व राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
Makar Sanktari Festival Celebration Science Importance