विशेष प्रतिनिधी, मुंबई नाशिक
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात नव्याने विकसित झालेल्या तळेगाव-अक्राळे या औद्योगिक वसाहतीत जम्बो गुंतवणूक येणार आहे. आरोग्य क्षेत्राशी निगडित रिलायन्स लाईफ सायन्सेस आणि इंधन क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंडियन ऑईल या कंपन्यांना जागा उपलब्ध होणार आहे. या दोन्ही कंपन्यांद्वारे तब्बल १५५० कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून सुमारे ४ हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षात मोठी गुंतवणूक आलेली नाही. सिन्नर तालुक्यातील विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) द्वारे गुंतवणूक येण्याची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. या एसईझेडचे अद्याप पुढे काहीही झालेले नाही. त्यातच आता नव्याने विकसित झालेल्या तळेगाव-अक्राळे या औद्योगिक वसाहतीत दोन मोठ्या कंपन्यांना जागा उपलब्ध होत आहे.
रिलायन्स लाईफ सायन्सेस
रिलायन्स लाईफ सायन्सेस ही कंपनी आरोग्य क्षेत्रातील मोठी कंपनी असून ती विविध प्रकारच्या लस तयार करते. या कंपनीला १६० एकर जागा तळेगाव-अक्राळे येथे मिळणार आहे. ही कंपनी याठिकाणी तब्बल १२०० कोटी रुपयांची गुंतवणूक करुन भव्य प्रकल्प उभारणार आहे. तर, याठिकाणी ३ ते साडेतीन हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाशी (एमआयडीसी) करार व जागेचे पैसे अदा केल्यानंतर साधारण महिन्याभरात कंपनीला जागेचा ताबा दिला जाणार आहे.
इंडियन ऑईल
नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेली इंडियन ऑईल या कंपनीचा नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीत प्रकल्प कार्यरत आहे. क्रायोजेनिक स्वरुपातील विविध उपकरणे या प्रकल्पात तयार केले जातात. मात्र, येथील जागा सध्या अपुरी पडत आहे. देशभरात मागणी असलेल्या या उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी कंपनीने एमआयडीसीकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार कंपनीला ५० एकर जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. येथे इंडियन ऑईल कडून जवळपास ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. याद्वारे ५०० ते ६०० जणांना रोजगार मिळणार आहे. जागेची सर्व प्रक्रिया महिन्याभरात पार पडणार आहे.
—
नाशिक जिल्ह्यात रिलायन्स लाईफ सायन्स आणि इंडियन ऑईल या कंपन्यांनी जागा मागितली होती. त्या देण्यात येत आहेत. अजूनही तेथे २७५ एकर जागा शिल्लक आहे. इच्छुक उद्योजकांनी एमआयडीसीशी संपर्क साधावा.
अभिषेक क्रृष्णा, सह मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी
—
तळेगाव-अक्राळे या औद्योगिक वसाहतीत सर्व सुविधा सज्ज आहेत. इच्छुकांनी संपर्क साधल्यावर योग्य ती कार्यवाही त्वरीत केली जाईल.
नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी
—
गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर नाशिक जिल्ह्यात मोठी गुंतवणूक येत आहे. त्याचे स्वागतच आहे. यापुढील काळातही अशी गुंतवणूक येणे आवश्यक आहे.
मनिष रावल, उद्योजक, नाशिक