पाटणा (बिहार) – बिहटाच्या मुख्य मार्केटमधील सराफा बाजारात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. तीन दुचाकींवर आलेल्या सहा मुखवटेधारी सशस्त्र दरोडेखोरांनी एका सराफी दुकानात अचानक प्रवेश करून लूट सुरू केली. यावेळी त्यांनी प्रथम पिस्तुलाच्या ठोक्याने दुकानातील कामगाराचे डोके फोडले. यावेळी दरोड्याला विरोध करत तिजोरीची चावी न दिल्याबद्दल दुकान मालकावर दरोडेखोरांनी तब्बल २८ गोळ्या झाडल्या. त्यामुळे सराफ व्यावसायिक जागेवरच ठार झाला. त्यानंतर दरोडेखोरांनी दुकानातून १२ लाखांहून अधिक किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लुटले. एवढेच नव्हे तर दहशत पसरवण्यासाठी दुकानाची जोरदार तोडफोड केली.
सराफ व्यावसायिकाला ठार केल्यानंतर दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत साखर मिल नौबतपूर रोडच्या दिशेने पळ काढला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलिस दलासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शहराची नाकाबंदी केली. याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी संजय सिंह म्हणाले की, एका सराफ व्यापाऱ्याचा गोळीबारात मृत्यू झाला आहे. हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेण्यात आले आहे. तसेच एएसपीच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करून दरोडेखोरांना शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
बिहटामध्ये गुन्हेगारांनी दुकानात घुसून सराफावर गोळ्या झाडल्या. ठार झालेले ज्वेलर मंटु कुमार हे दुकान बंद करून घरी जाण्याच्या तयारीत होते. तेव्हा सशस्त्र बदमाशांनी त्यांच्या दुकानात घुसून त्याला धमकावण्यास सुरुवात केली. दुकानाचे कामगार नीरज कुमार यांनी विरोध केल्यावर बदमाशांनी पिस्तुलाच्या बटाने त्याचे डोके फोडले. तसेच दुकानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांनी सराफाला शस्त्रे दाखवली आणि तिजोरीच्या चाव्या मागण्यास सुरुवात केली. मात्र चाव्या दिल्या नाहीत, तेव्हा दरोडेखोरांनी एकामागून एक बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पाहता पाहता त्यांनी तब्बल २८ गोळ्या झाडल्या. मंटू कुमार यांना छाती आणि डोक्यात गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
दुकानातील १२ लाखांहून अधिक किंमतीचे दागिने दरोडेखोरांनी लुटले आणि पळ काढला. प्रत्यक्षदर्शींंच्या म्हणण्यानुसार, गुन्हा करण्यासाठी आलेल्या सर्व दरोडेखोरांनी त्यांचे तोंड रुमालाने झाकले होते. त्यांनी दुकानापासून काही अंतरावर त्यांच्या बाईक पार्क केल्या होत्या. गुन्हा केल्यानंतर दरोडेखोरांनी दुचाकीवरून पळ काढला. त्यावेळी ते हवेत गोळीबार करीत होते. हा गोंधळ ऐकल्यावर, जेव्हा बाजारातील लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
काही लोकांनी या दरोडेखोरांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दरोडेखोरांनी पिस्तूल दाखवत गोळीबार करण्याची धमकी दिली. दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस दलासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी संपूर्ण बाजारपेठ बंद करून तपास सुरू केला. संशयाच्या आधारावर, पोलिसांनी त्यांच्या संभाव्य अड्ड्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी दुकाने बंद करून व्यापारी रस्त्यावर आले. कारण खून आणि दरोड्याची बातमी बाजारात सर्वत्र पसरली. पोलिसांच्या अपयशामुळे व्यापारी नाराज झाले असून त्यांनी संताप करीत दरोडेखोरांना तत्काळ अटक करावी, अन्यथा बाजारपेठ बंद करून आंदोलन करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा दिला आहे.