इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चेन्नईमध्ये रविवारी मोठी दुर्घटना टळली. मध्य स्थानकावर रिकामी लोकल रुळावरून घसरत थेट प्लॅटफॉर्मवर चढली. या दुर्घटनेवेळी लोकलमध्ये कुणीही प्रवासी नव्हता. त्यामुळे कुठलीही जिवीतहानी झालेली नाही.
दक्षिण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले की, रिकाम्या इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (EMU) यार्डातून प्लॅटफॉर्मवर हलवले जात असताना लोकल रुळावरुन घसरली. ईएमयू व्यस्त बीच-तांबरम मार्गाकडे वळवली जात होती. “शेड लाईनवरून प्लॅटफॉर्म एकवर रिकामा ईएमयू रेक हलवत असताना, रेकने प्लॅटफॉर्मचा बफर एंड तोडला आणि प्लॅटफॉर्म एकचे नुकसान झाले,” असे दक्षिण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एस गुगनेसन यांनी सांगितले. “रेक पूर्णपणे रिकामा होता आणि त्यात एकही प्रवासी नव्हता. प्लॅटफॉर्मवर कोणतीही जीवितहानी झाली नाही. शंटरने रेकवरून उडी मारली आणि त्याला दुखापत झाली नाही”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रक्रियेत प्लॅटफॉर्म शेल्टरचे नुकसान झाले असून घटनेचे कारण शोधण्यासाठी योग्य स्तरावर चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. ही रेल्वे रुळावरुन घसरल्यानंतर संबंधित बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. कोणाचा अपघात झाला का, कोणी जखमी झाले आहे का याबाबत विचारणा व्हायला लागली. कारण चेन्नईमधून दैनंदिन पातळीवर रेल्वे प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यामुळे या बातमीने काहीसा तणाव निर्माण केला होता. पण रेल्वेकडून ही रेल्वे रिकामी असल्याची माहिती देण्यात आल्याने चर्चांना पूर्णविराम मिळाला. शिवाय प्रसारमाध्यमांनीही याविषयीच्या बातम्या देऊन सत्यता समोर आणल्याने जनतेचा तणाव निवळला.