मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सलमान खानचा सुपरहीट सिनेमा ‘मैने प्यार किया’ याच्या प्रदर्शनाला तीन दशके झाली आहेत. तरीही हा चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित झाला तरी सर्व जण उत्सुकतेने बघत असतात. अनेक सिनेमात लीड रोलमध्ये सलमान खान दिसत असला तरीही त्यावेळी मुख्य भूमिकेतील त्याचा हा पहिलाच सिनेमा होता. याच सिनेमाची काही किस्से आपण आज जाणून घेणार आहोत.
‘मैने प्यार किया’नेच सलमानला कमालीची लोकप्रियता मिळाली. याच सिनेमातून भाग्यश्रीचे बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले होते. सूरज बडजात्याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. प्रत्येक चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान गमती जमती घडत असतात. तशा या चित्रपटाच्या वेळीही घडल्या. मात्र यातील एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. कारण तो खुद्द सलमान खानने सांगितला आहे. सलमानने चित्रपटात एन्ट्री केली तेव्हा तो खूप बारका होता. त्यामुळे तो कमालीचा त्रस्त होता. इतर हीरो छान फीट अँड फाईन असताना आपण मात्र असे असल्यामुळे त्याला चिंता वाटायची. एका मुलाखतीत सलमानने सांगितले होते की मैने प्यार कियाच्या सेटवर तो ३० पोळ्या आणि खूप सारी केळी खायचा जेणेकरून त्याचे वजन वाढेल.
चित्रपटाचे बजेट
१९८९ मध्ये तयार झालेल्या या चित्रपटाचे बजेट अवघे दोन कोटी रुपये होते आणि सलमान खानचे मानधन अवघे ३१ हजार रुपये होते. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र त्याने सर्व रेकॉर्ड्स मोडीत निघाले आणि तब्बल २८ कोटी रुपयांची कमाई निर्मात्याने केली.
काचेवर कीस
भाग्यश्रीचा हा पहिला सिनेमा होता. कुटुंबातील ज्येष्ठांनी तिला सिनेमात एकही किसींग सीन करायचा नाही असे स्पष्ट बजावले होते. चित्रपटासाठी तिने पहिल्यांदा जीन्स आणि वन पीस ड्रेस घातला हा. चित्रपटातील किसींग सीनसाठी सलमान आणि भाग्यश्रीच्या मध्ये काच उभी करण्यात आली. अर्थात कारण कुठलेही असले तरीही ही कल्पना अफलातून ठरली.
भाग्यश्रीचे लग्न
चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असतानाच भाग्यश्रीने आपल्या कुटुंबियांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले होते. हिमालय दासानी याच्यासोबत एका देवळात हे लग्न झाले आणि तिथे सलमान आणि सूरज बडजात्या यांची उपस्थिती होती.