इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणत्याही भागात प्रवासासाठी पूर्वीच्या काळात जीप सारखे दणकट वाहन असे, त्याचप्रमाणे आरामदायी गाडी म्हणून अॅम्बेसेडर कारचा वापर करण्यात येत असे, परंतु कालांतराने अनेक वाहन कंपन्यांनी नाना विविध प्रकारची वाहने बाजारात आणली. सध्याच्या काळात ग्राहकांना तथा वाहन चालकांना आपल्याकडे आकर्षक लुक आणि दणकट तसेच आरामदायी वाहन किंवा कार असावी असे वाटते.सहाजिकच महिंद्रा कंपनीच्या स्कार्पिओचा यामध्ये अग्रक्रम वरचा क्रमांक लागतो.
सध्या महिंद्राने देशात नवीन स्कॉर्पिओ एनसोबत जुन्या स्कॉर्पिओची विक्री सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, जुन्या मॉडेलची जागा नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकने घेतली आहे. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओ क्लासिक लाँच केली आहे. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे डिझाईन अपडेट करण्यात आले आहे. तसेच इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. यात नवीन फीचर्स आणि अपडेटेड सस्पेंशन देखील मिळेल.
महिंद्रा कंपनीने आपली नवीन स्कॉर्पिओ लाँच केली आहे. कंपनीने ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यानुसार सायंकाळी साडेपाच वाजता त्याचे लोकार्पण होणार आहे. टीझरमध्ये एसयूव्हीचा बाह्य भाग आणि त्यात इन्फोटेनमेंट सिस्टम बसवण्यात आली आहे. महिंद्राची ही कार स्कॉर्पिओ N 36 प्रकारांमध्ये असणार आहेत. तसेच नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक दोन ट्रिम्स-क्लासिक एस आणि क्लासिक एस 11 मध्ये ऑफर केली आहे. दोन्ही ट्रिम्स 7 आणि 9-सीट ऑप्शनमध्ये ऑफर केल्या आहेत. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकला नवीन ग्रिल डिझाइन, फॉक्स स्किड प्लेट आणि महिंद्राचा नवीन ‘ट्विन पीक्स’ लोगो देण्यात आला आहे.
टॉप-स्पेक क्लासिक एस 11 मध्ये 17-इंच ड्युअल-टोन अलॉय मिळतील, तर क्लासिक एसला स्टील व्हील मिळतील. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यात सेंटर कन्सोलमध्ये डार्क वुडन ट्रिम इन्सर्ट आणि डॅशबोर्डवर पियानो ब्लॅक इन्सर्ट देण्यात आला आहे. याचा गियर लीव्हर नवीन थारमधून घेण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, नवीन स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, पॅनिक ब्रेक इंडिकेशन, अँटी थेफ्ट वॉर्निंग, सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प, स्पीड अलर्ट आणि ड्रायव्हिंग करताना ऑटो डोअर लॉक यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे कंपनीने स्कॉर्पिओ एन मध्ये एकदम नवीन सिंगल ग्रिल दिली आहे. यामध्ये क्रोम फिनिशिंग दिसत आहे. ग्रिलवर कंपनीचा नवीन लोगो दिसतो. त्याच्या पुढच्या भागाचे सौंदर्य वाढवतं. यामध्ये पुन्हा डिझाइन केलेले एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग, सी-आकाराचे एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स, हेक्सागोनल लोअर ग्रिल इन्सर्टसह विस्तीर्ण सेंट्रल एअर इनलेट यांचा समावेश आहे.
नवीन महिंद्र स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर 4-सिलिंडर mHawk टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 3,750rpm वर 130bhp पॉवर आणि 1600-2800rpm वर 300Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. सस्पेंशनबद्दल बोलायचे झाले तर समोर डबल विश-बोन टाईप, इंडिपेंडंट फ्रंट कॉइल स्प्रिंग आणि मागील बाजूस अँटी-रोल बारसह मल्टी-लिंक कॉइल स्प्रिंग देण्यात आले आहे.
वास्तविक महिंद्राची ही ऑफ रोड एसयूव्ही गेल्या २० वर्षांपासून भारतातल्या रस्त्यांवर रुबाबात मिरवतेय. आता कंपनीने त्यांच्या न्यू स्कॉर्पिओ क्लासिक या कारमध्ये ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार आणि मागणीनुसार अनेक बदल केले आहेत. ही एसयूव्ही शहरांसह ग्रामीण भागातील लोकांना देखील खूप आवडते. त्यामुळे या कारचा नवा अवतार पाहून या कारच्या विक्रीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा कंपनीने व्यक्त केली आहे.
आतापर्यंत महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने स्कॉर्पिओचे सुमारे ८ लाखांहून अधिक मॉडेल्स विकले आहेत. ही भारतातली सर्वाधिक मागणी असलेली मोठी एसयूव्ही कार आहे. सशस्त्र दल, निमलष्करी आणि अंतर्गत सुरक्षा दलांसारख्या नामांकित संस्थांमधील अधिकारी कर्मचारी या वाहनाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. स्कॉर्पिओ क्लासिक कार अधिक दमदार परफॉर्मन्सचा दावा करते.
महिंद्रा कंपनी नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या वाहनांच्या इंटीरियर आणि एक्स्टीरियरवर विशेष मेहनत घेते. या स्कॉर्पिओ क्लासिकचं इंटीरियर प्रीमियम आहे. कंपनीने या कारला अधिक आकर्षक बनवण्यावर भर दिला आहे. यामध्ये नवीन टू टोन बेज अँड ब्लॅक इंटीरियर थीम, क्लासिक वूड पॅटर्न कन्सोल आणि प्रीमियम क्विल्टेड अपहोस्ट्री देण्यात आली आहे. या कारमध्ये फोन मिररिंग आणि अन्य मॉर्डन फंक्शनलिटीवाली तब्बल ९ इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.
Mahindra Scorpio Classic Launch Features Price and details
Automobile Vehicle