मुंबई – देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा ने त्यांची तब्बल ६०० डिझेल वाहने परत मागविली (रिकॉल) आहेत. संभाव्य त्रुटींमुळे ही वाहने मागविल्याचे कंपनीने जाहिर केले आहे.
नाशिकमधील कंपनीच्या कारखान्यामध्ये तयार केलेल्या काही मॉडेल्स मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा संशय आहे. त्यामुळेच कंपनीने वाहने रिकॉलचा निर्णय घेतला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने आपल्या काही वाहनांमध्ये डिझेल इंजिनची तपासणी व बदली करण्यासाठी वाहने रिकॉलची घोषणा केली आहे. सदर वाहने कंपनीच्या नाशिक कारखान्यात तयार केली जातात. याच कारखान्यात काही दिवशी दूषित इंधन प्राप्त झाले होते. याच दुषित इंधनामुळे डिझेल इंजिनमध्ये काही त्रुटी राहिल्याची कंपनीला शंका आहे. २१ जून ते २ जुलै २०२१ या कालावधीत नाशिकच्या कारखान्यामध्ये ही वाहने तयार झाली आहेत.
कंपनीने म्हटले आहे की, ही रिकॉल पूर्णपणे ऐच्छिक आहे. ग्राहकांशी ई-मेल, कॉल किंवा मेसेजद्वारे संपर्क साधला जाईल. डिलरद्वारे ही प्रक्रिया होईल. वाहन तपासणी किंवा कोणताही भाग बदलल्यास ग्राहकाकडून कुठलेही पैसे घेतले जाणार नाहीत. ही सेवा पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. तथापि, या रिकॉलमध्ये कोणत्या मॉडेलचा समावेश आहे याबद्दल कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. कंपनीच्या वाहन पोर्टफोलिओमध्ये अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. नाशिकच्या कारखान्यात स्कॉर्पिओ, मरॅझो, बोलेरो आणि एक्सयूव्ही ३०० या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे यातील नक्की कोणती वाहने रिकॉल करण्यात आली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.