मुंबई – नाशिकच्या कारखान्यातून तयार झालेल्या ६०० वाहनांमध्ये दोष असल्याने ही वाहने परत मागविणार असल्याचे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जाहिर केले होते. त्यास काही दिवस होत नाही तोच आता पुन्हा कंपनीने मोठी माहिती जाहिर केली आहे. कंपनीच्या तब्बल ३० हजार वाहने परत मागविण्याचे कंपनीने निश्चित केले आहे. यापूर्वीही अशाच वाहनांमध्ये दोष आढळल्याने ती परत मागविण्यात आली होती.
महिंद्रा अँड महिंद्राने कंपनीने आपल्या उत्पादित केलेल्या २९ हजार ८७८ पिकअप ट्रक या प्रकारातील वाहनांना रिकॉल करण्याची म्हणजेच परत बोलविण्याची घोषणा केली आहे. खराब फ्लुईड पाईपच्या शंकेमुळे सदर पाईप बदलण्यासाठी आणि निरीक्षणासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. इतक्या मोठ्या संख्येत पिकअप ट्रक वाहने परत मागविण्याची घटना प्रथमच घडत आहे. विशेष म्हणजे, रिकॉल केलेली सदर पिकअप ट्रक वाहने जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१ या एक वर्षाच्या कालावधीत तयार करण्यात आली आहेत.
सदर पिकअप ट्रक वाहनांची निरीक्षण आणि दुरुस्ती मोफत केली जाणार असून या वाहनांच्या मालकांना डीलरशिपकडून व्यक्तीगतरित्या फोनद्वारे संपर्क साधला जाणार आहे. आपल्या ग्राहकांना वाहनांबाबत कोणताही त्रासदायक अनुभव येऊ नये, असा कंपनीचा प्रयत्न आहे, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
गेल्या महिन्यातही कंपनीने जवळपास ६०० डिझेल वाहने परत मागवली होती. ती कथीत सदोष वाहने २१ जून ते २ जुलै २०२१ दरम्यान कंपनीच्या नाशिक येथील प्लांटमध्ये तयार झालेली होती. त्यावेळी या वाहनांच्या डिझेल इंजिनमध्ये त्रुटी आढळून आल्याने कंपनीने या गाड्या परत मागवल्या होत्या. तसेच आता देखील या कंपनीने ३० हजार पिक-अप ट्रक वाहने परत मागविण्याचे जाहीर केले आहे. सदर वाहनांची तपासणी केल्यानंतर आवश्यक बदल केले जातील. तसेच वाहनांची मोफत तपासणी करून दुरुस्ती कंपनीकडून केली जाणार आहे.