मुंबई – महिंद्रा अँड महिंद्रा या देशातील प्रमुख वाहन निर्माता कंपनीने वाहनांच्या किमती अपडेट केल्या आहेत. या वर्षी कंपनीकडून सलग चौथ्यांदा वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. कंपनीने वेगवेगळ्या मॉडेलच्या किमतीत ३० हजार रुपयांपर्यंत वाढ केली असून, ही वाढ याच महिन्यापासून लागू केली जाईल.
महिंद्राची प्रसिद्ध एमपीव्ही Marazzo एकूण तीन व्हेरिएंट्स आणि दोन सीटिंग ले आउट (७ सीट आणि ८ सीट) सह मिळत आहे. तिच्या बेस व्हेरिएंट M2 च्या किमतीत १२ हजार रुपये, मीडियम व्हेरिएंट M4 च्या किमतीत १३ हजार रुपये आणि टॉप मॉडेल MG Plus व्हेरिएंटच्या किमतीत १४ हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
कंपनीने नुकतंच Bolero Neo या व्हेरिएंटचे स्थानिक बाजारात अनावरण केले होते. तिची किंमत वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार २८ हजार रुपयांपासून ३० हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. कंपनीने यामध्ये १.५ लिटर क्षमतेच्या डिझेल इंजिनचा वापर केला आहे.
कंपनीचा Mahindra Scorpio हा तिसरा मॉडेल महाग झाला आहे. या एसयूव्हीसाठी आता तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत. ही एसयूव्ही एकूण पाच व्हेरिएंटससह बाजारात उपलब्ध आहे. त्यांच्या किमतीत १८ हजारांपासून ते २२ हजारांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या नेक्स्ट जनरेशनवरही कंपनीकडून काम सुरू आहे. स्कॉर्पिओच्या नव्या जनरेशन मॉडेलचे लवकरच बाजारात अनावरण करण्यात येणार आहे.